“गोळ्या चालवण्याचे आदेश दिलेल्या नेत्यांना मराठवाड्यात पाय ठेवू देऊ नका”, राज ठाकरेंचं आवाहन
!["गोळ्या चालवण्याचे आदेश दिलेल्या नेत्यांना मराठवाड्यात पाय ठेवू देऊ नका", राज ठाकरेंचं आवाहन raj thackeray](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/09/raj-thackeray-780x470.jpg)
जालना | Raj Thackeray – मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (4 सप्टेंबर) जालन्यात (Jalna) जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी घटनेची माहिती घेत उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पोलिसांना लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? असा सवाल उपस्थित केला. तसंच ज्यांनी पोलिसांना गोळ्या चालवण्याचे आदेश दिले आहेत, त्यांना मराठवाड्यात पाय ठेवू देऊ नका, असं आवानही राज ठाकरेंनी केलं.
उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, मी आज येथे भाषण करायला आलो नाही, तर आवाहन करायला आलो आहे. तुमच्यावर ज्या लोकांनी पोलिसांना गोळ्या चालवण्याचे आदेश दिले त्यांना मराठवाड्यात येऊ देऊ नका. त्या नेत्यांना मराठवाड्यात पाय ठेवू देऊ नका. जोपर्यंत झालेल्या प्रकाराची कोणी माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना मराठवाड्यात येऊ देऊ नका, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.
पुढे बोलताना राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस म्हणतात झालेल्या घटनेचं राजकारण करू नका. अरे वाह.. जर तुम्ही विरोधी पक्षात असता तर तुम्हीही हेच राजकारण केलं असतं ना? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. तसंच मी येथे राजकारण करायला आलो नाही. लाठीचाराचे व्हिडीओ मी पाहिले. मला राहावलं नाही म्हणून मी भेटायला आलो. आता मी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेईल आणि त्यांच्या कानावर हा विषय टाकेन, असंही राज ठाकरे म्हणाले.