अतिक्रमण विरोधात पालिकेची धडक कारवाई!
![अतिक्रमण विरोधात पालिकेची धडक कारवाई! pune 3](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/09/pune-3-780x470.jpg)
पुणे | Pune News – आज (6 सप्टेंबर) वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कर्वेनगर प्रभाग क्रमांक १३ मधील नेहरू वसाहत येथे फुटपाथ अतिक्रमण कारवाई करण्यात आली. त्यामध्ये फुटपाथवरील अनधिकृत असलेले ओटे, जनावरांचे गोठे, जनावरे आणि इतर फर्निचरचे साहित्य तसेच पत्र्याचे शेड्स यावर संबंधित कारवाई करण्यात आली.
नेहरू वसाहत येथे परिमंडळ 3 सतत कार्यरत आहे, जवळच मेट्रो स्टेशन आहे. ह्या अतिक्रमणाच्या तक्रारी अनेक नागरिकांनी केल्या होत्या. नेहरू वसाहतीतील लोकांनी रस्त्यावरच गोठे उभारल्यामुळे आणि गायी, म्हशी रस्त्यातच बांधल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. तसेच रस्त्यावरील गोठ्यांमुळे सर्वत्र दुर्गंधी, ड्रेनेजच्या समस्या, विविध आजार इत्यादी समस्या निर्माण होत होत्या. आजूबाजूला वास्तव्यास असलेल्या अनेक लोकांच्या तक्रारीही येत होत्या. सोबतच त्या वसाहतीतील लोकांना जेवढे क्षेत्र दिलं आहे त्यापेक्षा वाढीव क्षेत्र लावून जास्त पुढे आल्यामुळे महापालिकेनं ही कारवाई केली आहे.
या कारवाईमध्ये पुणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग, विद्युत विभाग, पोलीस कर्मचारी, मुख्य खात्याकडील पोलीस कर्मचारी इत्यादी सहभागी होते. सोबतच वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचा स्टाफदेखील कारवाईदरम्यान समाविष्ट होता. या कारवाईमध्ये २५ बिगारी, जेसीबी, ट्रान्सपोर्ट्सचे ट्रक, जनावरे उचलण्यासाठीची गाडी, गॅस कटर व त्या अनुषांगिक सगळ्या गोष्टी उपलब्ध करून घेऊन महापालिकेकडून सदर कारवाई करण्यात आली.
नेहरू वसाहतीतील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना महापालिकेनं फक्त दोन दिवस अगोदर कारवाईची नोटीस दिली होती. त्यांना सामान उचलण्यासाठी वेळ देखील दिला नव्हता, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. तर दुसरीकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी वसाहतीतील नागरिकांना आठ दिवस अगोदरच नोटीस दिली होती आणि सोबतच त्यांना तेथे वारंवार जाऊन देखील सांगण्यात आले होते. तरी देखील त्यांनी तेथील सामान, गोठे, जनावरे हटवले नसल्यामुळे संबंधित कारवाई करण्यात आली.