…त्यामुळे मी उपोषण मागे घेतलं; मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? मनोज जरांगेंनी दिली माहिती, म्हणाले…
![...त्यामुळे मी उपोषण मागे घेतलं; मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? मनोज जरांगेंनी दिली माहिती, म्हणाले... manoj jarange 1 2](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/09/manoj-jarange-1-2-780x470.jpg)
जालना | Manoj Jarange Patil – आज (14 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) जालन्यातील (Jalna) अंतरवाली सराटी गावात जाऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे जरांगेंची समजूत काढण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे अखेर 17 व्या दिवशी जरांगेंनी त्यांचं उपोषण सोडलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. पण हे उपोषण जरांगेंनी मागे जरी घेतलं असलं तरीही त्यांचं साखळी उपोषण सुरूच राहणार आहे. तर जरांगेंची मुख्यमंत्र्यांसोबत नेमकी काय चर्चा झाली? त्यांनी उपोषण मागे घेण्याच्या निर्णय का घेतल? याबाबत स्पष्टीकरण दिलं.
मनोज जरांगेंनी सांगितलं की, मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: लक्ष घालणार आहेत. मी आधीपासूनच म्हणत होतो की, मराठा समाजाला एकनाथ शिंदेच न्याय देतील. मराठा समाजाला देखील मुख्यमंत्र्यांकडून हीच अपेक्षा आहे. त्यामुळे आपल्याला शांततेत आंदोलन करायचं आहे.
सरकारनं मराठा आरक्षणासाठी एक महिन्याचा कालावधी मागितला होता. तसंच सर्व जनतेनं देखील सांगितलं की सरकारला वेळ देऊन पाहा. समाजाकडून एकमतानं सांगण्यात आल्यामुळे मी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. पण जरी मी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला असला तरीही मी आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असंही मनोज जरांगेंनी सांगितलं.
मला एक चिठ्ठी देण्यात आली, त्यामुळे लोकांमध्ये चर्चा झाली. पण मी तशी औलाद नाही, तसले धंदे मी करत नाही. मराठा समाजासोबत मी पारदर्शक आहे. मराठा समाजासोबत कधीही गद्दारी करणार नाही. मी तुम्हाला आरक्षण मिळवून देणार. तसंच तुमच्या राजकारणासाठी माझ्या पोरांचं वाटोळे करू नका. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी इथून हलणार नाही आणि मुख्यमंत्र्यांना देखील हलू देणार नाही. वेळ घ्या पण आरक्षण द्या, अशी मराठ्यांची मागणी आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले.