देश - विदेशपुणेमनोरंजन

अमेरिकेत प्रथमच रंगणार मराठी चित्रपट महोत्सव

गेल्या २३ वर्षांत जगभरातील चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरलेला ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ (पिफ) यंदा पहिल्यांदाच देशाबाहेर आयोजित करण्यात आला आहे. ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ आणि ‘पिफ’ यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकेतील सॅन होजे येथे २७ आणि २८ जुलै रोजी ‘नाफा मराठी चित्रपट महोत्सव’ होणार आहे. मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा, या उद्देशाने होणारा हा मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकार यांच्या वतीने ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ आयोजित करण्यात येते. आतापर्यंत पुण्याबाहेर मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, नागपूर या शहरांमध्ये ‘पिफ’चे आयोजन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता पहिल्यांदाच ‘पिफ’चे आयोजन देशाबाहेर केले जात आहे.

‘अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचे अधिवेशन नुकतेच पार पडल्यानंतर २७ आणि २८ जुलै रोजी ‘नाफा मराठी चित्रपट महोत्सव’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळावे; तसेच तेथूनही चांगली चित्रपट निर्मिती व्हावी, या उद्देशाने हा महोत्सव यापुढे दरवर्षी केले जाणार आहे,’ अशी माहिती ‘पिफ’चे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.

‘पिफ आणि नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन यांच्यात करार झाला असून ‘नाफा’ महोत्सवाचे हे पहिले वर्ष आहे. दर वर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.

‘पिफ’मध्ये ‘संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पारितोषिक’ पटकावलेला ‘स्थळ’; तसेच दिठी हे चित्रपट यंदा दाखविण्यात येणार आहेत. याशिवाय काही चित्रपटांचा प्रीमिअर, लघुपट, लघुपट कार्यशाळा, व्याख्यान, मुलाखती असा भरगच्च कार्यक्रम महोत्सवात आखण्यात आला आहे.

नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, निवेदिता सराफ, सचिन आणि सुप्रिया पिळगावकर, महेश आणि मेधा मांजरेकर, अश्विनी भावे, सुबोध भावे, मृणाल कुलकर्णी, प्रसाद ओक, डॉ. सलील कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णी हे कलाकार यंदाच्या महोत्सवात सहभागी होणार आहेत, अशी माहिती संयोजकांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये