थंडीचा जोर वाढला१ राज्यात १५ नोव्हेंबरपासून गारठा वाढणार

यबंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल होणार आहे. सध्या कुठे थंडी तर कुठे उष्णता असं वातावरण दिसून येत आहे. पुढील ४८ तासात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम हा राज्यातील हवामानावर होणार आहे.
सध्या मुंबई, ठाणे, उपनगर व नवी मुंबईतही पहाटे गारवा जाणवत आहे. तर दिवसभर उकाडा जाणवू लागला आहे. पुण्यात देखील सकाळी थंड वारे वाहत असून धुक्याची चादरही दिसू लागली आहे. राज्यात, सांगली, नाशिक, नागपूर, जळगाव जिल्ह्यात थंडी वाढली आहे.
१५ नोव्हेंबरनंतर थंडी वाढणार
दिवाळीनंतर राज्यात तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात घट होण्यास सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाडचा पारा सर्वाधिक खाली घसरला आहे. तर, काही ठिकाणी रात्रीच्या वेळी थंडी जाणवू लागली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक आता शेकोट्यांचा आधार घेत आहेत. पुढील काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
१५ नोव्हेंबरनंतर थंडीचा कडाका वाढणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत संपूर्ण राज्यात थंडी पडण्याची शक्यता आहे.वातावरणात बदल होत असल्याने आरोग्याच्या तक्रारीही वाढू शकतात, त्यामुळे या काळात आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
कोणत्या भागात किती तापमान नोंद झाली?
दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये नाशिकमध्ये राज्यातील नीचांकी तापमान नोंदवले गेले आहे. त्यापाठोपाठ पुण्यात १५.२ अंश सेल्सिअस, जळगाव १५.८ अंश सेल्सिअस, महाबळेश्वर १५.६ अंश सेल्सिअस, मालेगाव १७.८ अंश सेल्सिअस, सातारा १६.६ अंश सेल्सिअस, परभणी १८.३ अंश सेल्सिअस, नागपूर १८,६ अंश सेल्सिअस, सांगली १४.४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली.