देहूतील अनाधिकृत होर्डिंग रडारवर; नगरपंचायत प्रशासनाकडून कारवाई

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उमेदवारांचे अभिनंदन करणारे, शुभेच्छा देणारे तसेच मतदान केल्याबद्दल मतदारांचे आभार मानणारे बॅनर नगरपंचायत हद्दीत लावण्यात आले होते. तसेच विविध व्यवसाय, उद्घाटने यांच्या जाहिरातींचे फ्लेक्स नगरपंचायत प्रशासनाची परवानगी न घेता अनधिकृतपणे लावण्यात आले होते. देहू नागरी मध्ये विद्रुपीकरण पुन्हा सुरू झाल्यामुळे प्रशासनाकडून हि कारवाई जोरदारपणे सुरु करण्यात आली आहे.
नगरपंचायतीने निश्चित केलेल्या ठिकाणावर जाहिरात फलके, बॅनर लागलेले नसल्याने शहराच्या विपुद्रीकरणात भर पडली होती. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशान्वये मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली नगररचना विभागाचे सुरेंद्र आंधळे, धनंजय नायकवडे, कर विभागाचे ज्ञानेश्वर शिंदे, नगरपंचायतीचे कर्मचारी यांनी ही कारवाई केली. डॉ. आंबेडकर चौक ते मुख्य प्रवेशद्वार जवळील तसेच देहू-देहूरोड मार्ग, परंडवाल चौक आणि देहू आळंदी मार्ग काळोखे चौक दरम्यानचे सुमारे ३५ फ्लेक्स काढण्यात आले. तसेच उर्वरित ठिकाणचे अनधिकृत फ्लेक्स, बॅनरवर कारवाई करण्यात येणार आहे.
पालिका निवडणुकीच्या शक्यतेने बॅनरबाजी
दरम्यान, आता महापालिका निवडणूक लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने निवडून आलेल्या आमदारांना खूश करण्यासाठी कार्यकर्त्याकडून चौकाचौकात फ्लेक्स लवण्यात आले आहेत. काही भागात फ्लेक्समुळे पदचार्यांना चालणे देखील कठीण झाले आहे. वाहनचालकांना वाहन चालवताना फ्लेक्स लक्ष वेधून घेत असल्याने रस्त्याचा अंदाज येत नाही. संपूर्ण शहरात हे चित्र आहे.
न्यायालयाने कान टोचल्यानंतर प्रशासनाला जाग
खरेतर महापालिकेने इशारा देऊनही हे फ्लेक्स लागले. यावर मात्रा म्हणून केवळ कागदी घोडे नाचवण्याचे उद्योग महापालिकेने सुरू केले आहेत. महापालिका प्रशासनाने अनधिकृत फ्ले्क्स लावणार्यांवर गुन्हे दाखल करण्याबाबत पोलीसांना कळविले आहे. एकही गुन्हा अद्याप दाखल झाला नाही. न्यायालयाने कान टोचल्यानंतर महापालिका आणि पोलीस प्रशासनाला जाग आली असल्याचे यामुळे समोर आले आहे.