चिंतनाची आवश्यकता

समाजात क्रिया घडली की, प्रतिक्रिया ही उमटणारच. त्याचा कालखंड आणि प्रतिक्रिया घडण्याची वेळ ही कमीजास्त असू शकेल. मात्र प्रतिक्रिया सकारात्मक उमटावी आणि विधायक समाजाची निर्मिती त्यात व्हावी या उद्देशाने आपल्या क्रिया असाव्यात. किमान याचा विचार तरी यानिमित्ताने करणे गरजेचे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय डावपेच संपल्यानंतर आता त्यांच्या आवडत्या विषयाला हात घातला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे चरित्रकार बाबासाहेब पुरंद, समर्थ रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव हे त्यांचे आवडते विषय आहेत. दर सहा-आठ महिन्यांनी ते या विषयावर तज्ज्ञ लोकांकडून माहिती घेऊन, समाजाला माहिती देत असतात. त्यांच्या या कृतीबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. स्वयंघोषित विद्वान, इतिहासाचे लेखक असणार्या मंडळींनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन हा शरद पवार यांनी माहिती देण्यासाठीचा महत्त्वाचा प्रसंग असतो. अशा कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची थोरवी सांगणे आणि त्याप्रमाणे समाजाला मार्गदर्शन करणे, या कार्याबरोबरच बाबासाहेब पुरंदरे हे किती चुकीचे होते. त्यांनी मुघलांच्या अन्यायाविरुद्ध दंड थोपटून स्वराज्य निर्माण केले त्या छत्रपती शिवाजी महाराजांवर कसा अन्याय केला हे नुकतेच एका कार्यक्रमात सांगितले. खरोखरच या विचारांचे कौतुक आणि अभिनंदन केले पाहिजे. खतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या अभ्यासाचा अत्यंत गौरवास्पद शब्दांमध्ये शरद पवार यांनीच सन्मान केला आहे. एकदा नव्हे दोनदा त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना सन्मानित करून त्यांचे विचार समाजाला मार्गदर्शक आहेत असे सांगितले.
आता या त्यांच्या विचाराला ते चुकीचे ठरवत असतील तर त्यांच्या कोणत्या विचारावर आणि मार्गदर्शनावर त्यांच्या समर्थकांनी विश्वास ठेवायचा. एका पाश्चात्त्य विचारवंतांनी आणि राजकारण्यांनी, मी जे शेवटी बोलतो ते सत्य असते. त्यापूर्वीचे दाखले देत जाऊ नका, असे एकदा पत्रकारांना स्पष्ट सुनावले होते. कदाचित या विचारांचेच आचरण शरद पवार करीत असावेत. नेत्याने मार्गदर्शन करावे यासाठी भक्कम वैचारिक चौकट असणे आवश्यक असते. ही चौकट त्याच्या आवडत्या विषयाबद्दल तो नेता तयार करू शकतो. मात्र कार्यकर्ते नेत्याला अक्षरशः डोक्यावर चढवून बसवतात. त्यामुळे खेळापासून राजकारणापर्यंत, साहित्य- संस्कृतीपासून अंतरिक्ष ज्ञानापर्यंत किंवा तत्त्वज्ञानापासून चित्रपटांपर्यंत सर्व विषयांवर नेतेमंडळी अधिकारवाणीने बोलण्यास सक्षम आहेत, असा कार्यकर्त्यांचा विश्वास असतो आणि या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून राजकारणी मंडळी आपल्या अभिरुचीच्या अभ्यासाचा विषय नसलेल्या क्षेत्रातही धाडसाने मुशाफिरी करतात. मूळ विषय आणि त्याचे संशोधन यासंदर्भात माहिती नसली तरी चालेल. तात्पुरत्या दिल्या गेलेल्या माहितीवर टून बोलणे आणि समर्थकांनी ते उचलून धरणे एवढे झाले म्हणजे दिवस सार्थकी लागला एवढाच नेत्यांचा भाग असतो. यात नेतेमंडळींची चूक आहे असे म्हणणे धाडसाचे होईल.
कारण कार्यकर्त्यांचा आग्रह नेत्यांना मोडवत नाही आणि त्यामुळे सवंगतेकडे झुकणार्या प्रसिद्धीला नेतेमंडळी बळी पडतात. मात्र या सवंगतेने बोललेल्या विचारांचा परिणाम समाजमनावर होत असतो, याचा विचारही लाखो मंडळींचे नेतृत्व करणार्या नेतेलोकांनी केला पाहिजे. आपल्या बोलण्यामुळे समाज, धर्म किंवा इतर काही बाबतींत भेद निर्माण होतात का? दरी तयार होते आहे का? याची माहिती आणि जाणीव नेतेमंडळींनी ठेवली पाहिजे. आपले बोलणे समाजाला दिशा देऊ शकत नसेल तर निदान अयोग्य मार्गावर नेणारी नाही याचे भानही ठेवले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरचा अभ्यास आणि त्यांच्या महतीबद्दल बोलणे एवढाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभातला मुद्दा असू शकतो. यामध्ये राजकारणाचा तिरपा डोळा किंवा एखादा समाजविचाराला धक्का बसेल अशी विचारधारा आपण मांडतो आहोत का आणि मुद्दामहून मांडत असू तर त्याच्या होणार्या परिणामांना आपण जबाबदार आहोत, असे स्पष्ट करून ही विधाने केली पाहिजेत. अनेक इतिहासकार आजही साक्षेपाने अभ्यास करतात. संशोधनाची अनेक साधने उपलब्ध आहेत.
अशा परिस्थितीत इतिहासाचा धांडोळा घेणे आणि मगच त्यावर सामाजिकरीत्या मत व्यक्त करणे, हे केले पाहिजे. आजही महाराष्ट्रात हजारो-लाखो ऐतिहासिक कागदपत्रे वाचली गेलेली नाहीत. त्या वाचनातून एखादा धक्कादायक निर्णय समोर आला तर तो पचवण्याची मनोभूमिका समाजाची केली पाहिजे. विद्वान मंडळी आणि नेतेमंडळींनी सुसंस्कृत आणि न्याय्य बाबींवर आधारित निर्णय पचवण्याची ताकद असणारा समाज घडवणे हे कर्तव्य समजले पाहिजे. अनेक प्रसंग केवळ गैरसमज आणि चुकीच्या माहितीवर घडले आहेत. त्याचा समाजाला फटका बसला आहे. तरीही आपल्याला योग्य, अयोग्यतेची जाणीव होत नसेल तर आपण केवळ राजकारण आणि मतांच्या पेटीसाठी हे उद्योग करीत आहोत असे मान्य केले पाहिजे. समाज साक्षर होत आहे. सुशिक्षित होत आहे का, याची माहिती आता घेणे गरजेचे झाले आहे. साक्षरतेचे प्रमाण वाढले म्हणजे समाज सुशिक्षित झाला असे म्हणता येणार नाही. किंबहुना अर्धवट माहितीच्या आधारावर मनभेदाचे जे प्रकार सुरू आहेत तेच चिंताजनक आहेत. या सगळ्यांचा विचार ज्यांच्या मागे लाखो मंडळी निर्धास्तपणे आणि निर्धाराने चालतात त्यांनी केला पाहिजे, पुतळे हलवणे किंवा इतिहासातून ती मंडळी नष्ट करणे, पुरस्कार बंद करणे हा खूप वरवरचा मार्ग झाला. सामाजिक सलोखा कायम ठेवणण्यासाठी सखोल चिंतनाची आवश्यकता आहे.