जातीधर्माच्या पलीकडे जाऊन स्वप्नं पाहण्याची उर्मी असावी; अंजली चिपलकट्टी

“माणूस असा का वागतो” अभ्यासिका विद्यार्थी समितीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन
पुणे | संविधान दिनाच्या (Constitution Day) पूर्वसंध्येला “माणूस असा का वागतो” या पुस्तकाच्या लेखिका अंजली चिपलकट्टी यांनी माणसांच्या मेंदूच्या उत्क्रांतीचा टप्पा मांडत जाती-धर्माच्या बेडीत अडकलेल्या समाजाला त्याच्या पलीकडे जाऊन स्वप्न पाहण्याची उर्मीच नव्या प्रगतीच्या वाटा खुल्या करून देऊ शकतात, असे प्रतिपादन केले. संविधानाची पंच्याहत्तरी साजरी करण्याच्या उद्देशाने अभ्यासिका विद्यार्थी समितीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
संविधान दिन ते प्रजासत्ताक दिन संविधानाची पंच्याहत्तरी हे अभियान राबविण्यात आले. त्याचा शुभारंभ संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आला. देशातील गरिबीचे प्रमाण वाढण्यासाठी सरकारी धोरणे अधिक कारणीभूत असतात. आर्थिक विषमता वाढवणारी धोरणे ही एका वर्गाचे हितसंबंध जपणारी तर दुसऱ्या वर्गाचे शोषण करणारी असतात. गेल्या काही वर्षात आर्थिक विषमता दुपटीने वाढली. आणि त्यातून गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले. या प्रश्नांना बेदखल करण्यासाठी सत्तेतील मंडळी जातीधर्म यांसारख्या धार्मिक भावनांच्या अस्मितांना भडकवण्याचा प्रयत्न करीत असतात.
धर्माचा उदय साधारण २५०० वर्षापूर्वी करुणेच्या भावनेने झाला. त्यातून कालांतराने धर्मात अनिष्ट प्रथा निर्माण होत त्यातून अनेक नवे धर्म आणि पंथ निर्माण होत गेले. त्याआधी धर्म नावाची कल्पनाच नव्हती. माणूस मेला की, त्याच्या शरीराचे काय होते, हे पाहण्यासाठी पूर्वी मृत शरीर जपून ठेवली जात. त्यांच्या अभ्यासातूनच माणसाच्या उत्क्रांतीचा, विविध संस्कृतीचा आणि मेंदूच्या विकासाच्या उत्क्रांतीचा अभ्यास करण्यात आला. भारतात जातीव्यवस्था ही मेंदूला कायम आपण कोणापेक्षा तरी श्रेष्ठ व कोणापेक्षा तरी दुय्यम अशी विषमतेची भावना निर्माण करते. ही भावना मनोबल खचवणारी असून प्रगतीतील अडसर आहे. त्याला विकसित करण्यासाठी आधी जाती धर्माची कवच कुंडले सोडली पाहिजे. सत्तेसाठी राजकीय क्षेत्रात जाती-धर्माचा वाढता वापर यावर अंजली चिपलकट्टी यांनी भाष्य केले. सांस्कृतिक वातावरण बदलणे ही आवश्यक बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
माणसाच्या मेंदूचे दोन प्रमुख भाग असून भावनात्मक बुद्धी बरोबरच तर्कबुद्धी सुद्धा विकसित करणे आवश्यक आहे. त्यासाठी सातत्यपूर्ण वाचन, कोडी सोडवणे आणि प्रश्न विचारून कुतूहल जागृत ठेवणे या माध्यमातून आपण आपल्या मेंदूचा अग्रीम भाग विकसित करू शकतो, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास मोहन वाडेकर, शारदा वाडेकर, सुधीर निरफराके, गणेश मेरगु, भास्कर नेटके, इब्राहिम खान, आकाश पवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय राऊत यांनी केले. अरिहंत अनामिका यांनी “जात वेगळी नाही, आम्हा धर्म वेगळा नाही” या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली तसेच छाया काविरे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन समितीचे अध्यक्ष ओंकार मोरे आणि सहकाऱ्यांनी केले.