अनुयायींचा प्रवास होणार सोपा! भीमा कोरेगावसाठी जादा बसेस

पुणे | भीमा कोरेगाव (Bhima Koregaon) येथे दि. 1 जानेवारी रोजी होणाऱ्या विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाची पुणे जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी पीएमपीएमएलकडूनही (PMPML) अधिक बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला 370 अधिक बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायींचा प्रवास अधिक सोपा होणार आहे.
वाहनतळ आणि परिसरात फिरण्यासाठी 280 मोफत बस आणि पुण्यातून 8 स्थानकावरुन तिकीट असलेल्या 90 बस सोडल्या जाणार आहे. पुणे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांच्याकडून यंदा चोख नियोजन करण्यात येत आहे. हा शौर्यदिन उत्साहात साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी देखील कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक मूलभूत सुविधा द्या, असे आदेश दिले आहेत.
राज्यभरातून मोठ्या प्रमाणात अनुयायी येत असल्याने पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी. पाणी पिण्यासाठी कागदी ग्लासची व्यवस्था करावी. अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेता त्या प्रमाणात सुविधा निर्माण करण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले. त्यानुसार तयारीला सुरुवात झाली आहे. सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
‘या’ परिसरातून धावणार बसेस..
- पुणे स्टेशनवरुन 38
- मनपावरुन 35
- दापोडी मंत्री निकेतन 2
- ढोलेपाटील रोड मनपा शाळा 2
- अप्पर डेपो बस स्थानक 4
- पिंपरी आंबेडकर चौक 3
- भोसरी स्थानक 4
- हडपसर स्थानकावरुन 2
- नियमित बस – 55
- अतिरिक्त बस – 35