14 वर्षांचा वनवास, रावणाचा कपटीपणा अन् रामसेतू, बहुचर्चित ‘आदिपुरुष’चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई | मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत यांच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. नुकताच ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर क्रिती सनॉनने सीता आणि सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे यामध्ये हनुमानाच्या भूमिकेत आहे.
या 3 मिनिटं 19 सेकंदांच्या या ट्रेलरला अवघ्या काही मिनिटांत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. हा चित्रपट सहा महिने आधीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील कलाकारांच्या लूकवरून आणि व्हिएफएक्सच्या दर्जावरून अनेकांनी टीका केली. त्यानंतर चित्रपटात महत्त्वपूर्ण बदल करण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाचं प्रदर्शन पाच ते सहा महिने पुढे ढकललं. आता हा चित्रपट येत्या 16 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
या ट्रेलरच्या सुरुवातीला हनुमान हा गुहेत तपश्चर्या करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर मग श्रीराम, लक्ष्मण हे सीतेसह वनवासात जातात. राम आणि लक्ष्मण शबरीने दिलेली उष्टी बोरे खाताना दिसत आहेत. तसेच लक्ष्मणाची प्रकृती ठीक व्हावी यासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणण्यापासून ते राम-लक्ष्मण वानरसेनेसह रामसेतूवरून लंकेला जाताना सर्व गोष्टींची झलक यात दाखवण्यात आली आहे. या ट्रेलरच्या सर्वात शेवटी रावणाची झलक दाखवण्यात आली आहे. या चित्रपटावर झालेल्या टीकेनंतर या चित्रपटाच्या व्हीएफएक्समध्ये बरेच मोठे बदल करण्यात आले आहेत. या चित्रपटातील रावणाची भूमिका साकारणाऱ्या सैफचा साधूमधील वेशांतर केलेला लूक ट्रेलरमध्ये पहायला मिळतो. मात्र सैफचा दुसरा लूक अद्याप ट्रेलरमध्ये पूर्णपणे दाखवण्यात आलेला नाही.