सभागृहात आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने

मुबई -Monsoon Session: विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा होताना दिसत आहे. मात्र, दुसरीकडे सभागृहातच राजकारणावरून देखील टीका-टिपण्णी होत आहे. कधी विरोधी पक्षनेते अजित पवार विरोधात शिंदे गटाचे आमदार तर कधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विरोधी पक्षांतील नेते असे वाद सुरूच आहेत. मात्र, आज तर थेट शिवसेना आमदार आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच सामना रंगल्याचं दिसलं.
मंबई महापालिकेच्या प्रभाग रचना विधेयकावर चर्चा होत असताना सभागृहात सत्ताधारी आणि विरोधाकांत जोरदार शाब्दिक वाद सुरु झाला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी उद्याच निवडणुका असल्यासारखं घाई का केली जात आहे? असा सवाल करत शिंदे सरकारवर निशाना साधला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिउत्तर दिलं.
महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या विधेयकावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी २२ ऑगस्ट २०२२च्या आदेशानुसार सुप्रीम कोर्टाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिल्याचं सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. उद्याच निवडणुका असल्यासारखी घाई का केली जात आहे? असा सवाल करत काही लोकांना निवडणुकांची भीती वाटत आहे असा टोला त्यांनी लगावला. त्याचबरोबर सर्वकाही घटनाबाह्य करायचं आहे का? सरकार घटनाबाह्य असल्यावर त्यावर काही बोलणार नाही असा चिमटा आदित्य ठाकरे यांनी काढला. त्यांच्या या वक्तव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.
मुंबई पालिकेच्या प्रभाग रचनेविरोधात ८९२ तक्रारी आल्याचं सांगून एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना प्रतिउत्तर दिलं. आपण कायद्याविरोधात कोणताही निर्णय घेत नसून, काही सदस्यांना वकिलांकडून चुकीची माहिती मिळाली असल्याने त्यांचा संभ्रम झाला असल्याचं सांगत एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय देखील वाचून दाखवला.
“घटनेच्या विरोधात हे सरकार स्थापन झालं आहे असं काहीजण म्हणत आहेत. दररोज सकाळी सुप्रीम कोर्टात अर्ज करायचे, पण लोकशाहीत बहुमताला महत्व आहे. देशात कायदे नियम आहेत. आम्ही बहुमताच्या नियामानुसारच काम करत आहोत. आमच्याकडे भक्कम बहुमत असताना आम्ही कशाला निवडणुकींना घाबरू? आम्ही घटनाबाह्य कृती केली नाही त्यामुळे सर्वांची अडचण होत आहे.” अशा पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना सभागृहात प्रतिउत्तर दिलं.