कोल्हापूरमधील महाविकास आघाडीच्या विजयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला. यामध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला व भाजपाला पराभवास सामोरं जावं लागलं आहे. काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी जवळपास १९ हजार मतांनी विजय मिळवला आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी पाहायला मिळाली. सोबतच, हिंदुत्वाच्या मुद्य्यावरून देखील ही निवडणूक चांगलीच रंगली होती. आता महाविकास आघाडीच्या या विजयावर शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, “कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला विजय मिळालेला आहे. आपण पाहीलं असेल तर मतांचा फरकही मोठा आहे. महत्वाची बाब हीच आहे की तिथल्या मतदारांनी महाविकास आघाडी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि आमच्या तिथल्या सर्व स्थानिक नेत्यांवर विश्वास ठेवून आज ही जागा पुन्हा महाविकासआघाडीकडे दिलेली आहे. कोल्हापूरचा विकास असेल किंवा महाराष्ट्राचा शाश्वत विकास असेल, यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत आणि तो आम्ही करतच राहू.”
पुढे आदित्य म्हणाले, “मला वाटतं पोटदुखी कुणाला नको म्हणूनच निकाल असे आले आहेत. महत्वाची गोष्ट हीच आहे की, महाराष्ट्रात जर आपण पाहिलं असेल तर कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीने जागा जिंकली आहे. मी आमच्यास सर्व कार्यकर्त्यांचं आणि तेथील स्थानिकांचं अभिनंदन करतो ज्यांनी मतदान केलं. कारण, त्यांनी हे ओळखून घेतलय की विकासासाठी कोण कटीबद्ध आहे, महाराष्ट्राचा विकास कोण करतय? आणि चांगली कामं कोण पुढे नेऊ शकतं.
“अयोध्येला आम्ही लवकरच जाणार आहोत, तिथे संघर्षाचा काळ आता संपलेला आहे. आता आशीर्वाद घेण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी लवकरच जाणार आहोत. मे महिन्याच्या अगोदरच आम्ही जाणार आहोत.” अशी माहिती देखील आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.