ॲड. शलाका खांडगे यांच्या स्मरणार्थ हॅप्पी स्टुडंट किटचे वाटप

तळेगाव : (कै.) शलाका संतोष खाडंगे हिच्या स्मरणार्थ तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण मंडळाच्या सर्व प्राथमिक शाळांतील आर्थिक, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना हॅप्पी स्टुडंट किटचे वाटप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर होते. तसेच शीतल शाह (DGN २२-२३), आणि तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे यांच्या हस्ते व मंगेश हांडे (डायरेक्टर फॉर लिटरसी), रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष संतोष खाडंगे, अध्यक्ष विन्सेंट सालेर, सचिव मिलिंद शेलार, उपाध्यक्ष राहुल खळदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या वेळी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या शाळेतील १७२ मुलांना रोटरी हॅप्पी स्टुडन्ट किट देण्यात आले. किटमध्ये स्कूल बॅग, टिफिन बाॅक्स, कंपास पेटी, वह्या आणि वॉटर बॅग हे साहित्य दिल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमात विद्यार्थी व मुख्याध्यापकांनी मनोगत व्यक्त केले. त्या वेळी ॲड. विनय दाभाडे यांनी त्या प्रसंगी शलाकाच्या स्मरणार्थ स्वातंत्र्यसंग्राम या महानाट्य कार्यक्रमाचे प्रथम प्रयोगाचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.प्रमुख पाहुणे शिल्पा रोडगे यांनी नगर परिषदेच्या शाळेसाठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीने जी मदत केली तशा स्वरूपाची मदत या पुढेही नगर परिषदेच्या शाळांना आपण करावी, असे आवाहन केले.