“आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कचखाऊ…”, कर्नाटक विधानसभेत महाराष्ट्राविरोधात ठराव मंजूर झाल्यानंतर अजित पवार संतापले
!["आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कचखाऊ...", कर्नाटक विधानसभेत महाराष्ट्राविरोधात ठराव मंजूर झाल्यानंतर अजित पवार संतापले ajit pawar basavraj bommai](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/12/ajit-pawar-basavraj-bommai-780x470.jpg)
नागपूर | Ajit Pawar – गुरूवारी (22 डिसेंबर) कर्नाटक विधानसभेत महाराष्ट्राविरोधात ठराव मंजूर करण्यात आला आहे. ‘महाराष्ट्रानं निर्माण केलेल्या वादाचा’ निषेध करणारा ठराव मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांनी मांडल्यानंतर तो एकमतानं मंजूर करण्यात आला. कर्नाटकच्या हिताचं रक्षण करावं आणि शेजारील राज्याला एक इंचही जमीन देऊ नये, असं या ठरावात म्हटलं आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर (State Government) टीका केली. तसंत सभागृहात उपस्थित राहायचं की नाही याबाबत आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ, अशी माहितीही त्यांनी दिली.
यावेळी अजित पवार म्हणाले, “आज (23 डिसेंबर) अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. तरीही राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कचखाऊ भूमिका का घेतात हे कळायला अर्थ नाही. मुंबईत झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आम्ही सांगतिलं होतं आणि त्यांनीही मराठी भाषिकांना दिलासा देण्यासाठी, मदत करण्यासाठी तसा संदेश देण्याची गरज असल्याचं मान्य केलं होतं. आपण दोन्ही सभागृहात एकमतानं ठराव करु असंही सांगितलं होतं. पण अजूनही आपला ठराव आलेला नाही. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्री एक इंचही जागा देणार नाहीत, असा ठराव करुन मोकळे झालेत”, अशी टीका अजित पवारांनी केली.
“ज्याप्रमाणे कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमकपणे त्यांची बाजू मांडताना दिसत आहेत. तसंच आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का मांडत नाहीत हा प्रश्न आम्हाला पडला आहे. याचं उत्तर त्यांच्याकडून आलं पाहिजे”, असंही अजित पवार म्हणाले.