“जे म्हणायचे लाव रे तो व्हिडीओ, त्यांचे…”, अजित पवारांचा राज ठाकरेंवर निशाणा

पुणे | Ajit Pawar On Raj Thackeray – विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे त्यांच्या रोखठोक विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. तसंच आज (28 ऑक्टोबर) पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्र सोडलं. यावेळी पत्रकार परिषदेच्या शेवटी चंद्रकांत पाटलांच्या एका मुद्द्यावर उत्तर देताना पवारांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर (Raj Thackeray) निशाणा साधला.
चंद्रकांत पाटील एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले असता त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हे गाणं वाजवणाऱ्या डीजेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अजित पवारांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले, यात चुकीचं काय झालं? असा उलट प्रश्न त्यांनी केला. मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी असे वाद उकरून काढले जातात, असंही अजित पवार म्हणाले. या वादांमुळे महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे का? असा सवालही पवारांनी केला.
दरम्यान, यावेळी पत्रकारांनी ‘लाव रे ते गाणं’ अशा चर्चा झाल्याचं म्हणताच अजित पवारांनी त्यावरून राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे खोचक टोला लगावला. “जाऊ द्या आता, जे म्हणायचे लाव रे तो व्हिडीओ त्यांचे काही महिन्यापूर्वी किंवा वर्षांपूर्वीचे विचार काय होते आणि आता काय आहेत ते बघा. आता काय, कुणाबद्दल न बोललेलंच बरं”, असं अजित पवार म्हणाले.