गिरीश बापट जाऊन तीन दिवस नाही झालं, निवडणूकीवर बोलणाऱ्या काँग्रेस नेत्याला अजितदादांनी खडसावलं
![गिरीश बापट जाऊन तीन दिवस नाही झालं, निवडणूकीवर बोलणाऱ्या काँग्रेस नेत्याला अजितदादांनी खडसावलं Ajit Pawar 34](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/03/Ajit-Pawar-34-780x470.jpg)
पुणे : (Ajit Pawar On Vijay Wadettiwar) पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी ऐतिहासिक असा विजय मिळवला होता. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा उत्साह दुणावला आहे. अशातच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. या वक्तव्यावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विजय वडेट्टीवार यांना फटकारले आहे.
आज सकाळी अजित पवार यांनी बापट कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी अजित पवार यांना विजय वडेट्टीवार यांनी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याच्या केलेल्या वक्तव्याविषयी विचारण्यात आले. यावर अजित पवार यांनी वडेट्टीवार यांना खडसावले. अजित पवार यांनी म्हटले की, ‘ हे बघा, लगेच कुणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. अजून गिरीश बापट जाऊन फक्त तिसरा दिवस आहे. एवढी कसली घाई आहे? माणसुकी वगैरे प्रकार आहे की नाही? काही परंपरा महाराष्ट्राची आहे की नाही. लोक काय म्हणतील यांना जनाची नाही तर मनाची तरी आहे की नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.
यावेळी अजित पवार यांनी शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनाही सुनावले. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत रोहित पवार यांना पाडण्यासाठी अजित पवार यांनी अनेकांना फोन केले होते, असा दावा नरेश म्हस्के यांनी केला होता. त्याबद्दल विचारणा झाल्यावर अजित पवार म्हणाले की, ‘कोण नरेश म्हस्के? मी त्याला ओळखत नाही’, असा पवित्रा घेत अजित पवार यांनी या विषयावर फार बोलणं टाळलं.