अजित पवार राजकारणाला रामराम ठोकणार? म्हणाले, “…त्यामुळे राजकारणातून सन्यास घेतलेला बरा”

नागपूर | Ajit Pawar – सध्या नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू असून काल (28 डिसेंबर) विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली होती. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना आव्हान दिलं होतं की, मी बारामतीमध्ये जाऊन राष्ट्रवादीला हरवून दाखवेन. जर मी मनावर घेतलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होईल, शिवसेनेचा केला तसा राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम करेन, असं बावनकुळे म्हणाले होते. त्यावर अजित पवार यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीतलं राष्ट्रवादीचं घड्याळ बंद करण्याचा इशारा दिला होता. यावर विधानसभा अधिवेशनादरम्यान सभागृहात बोलताना अजित पवार यांनी मनात आणलं तर बावनकुळे तुमचाच करेक्ट कार्यक्रम करणार, असा इशारा दिला होता. त्यानंतर बावनकुळेंनी अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं. अजित पवारांच्यात फार हिंमत आहे असं वाटलं होतं, लढवय्ये आहेत असं वाटलं. पण माझ्या एका दौऱ्यामध्ये त्यांच्यामध्ये इतका फरक पडला. अजित पवार यांना माझ्या एका दौऱ्यानं इतकी भीती वाटत आहे की ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला निघाले आहेत, असं बावनकुळे म्हणाले होते.
पुढे ते म्हणाले की, अजित पवार यांच्यात एवढी हिंमत नाही की ते आमचा करेक्ट कार्यक्रम करू शकतील. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत युती असून देखील राष्ट्रवादी कधी 75 च्या वर गेली नाही, त्यामुळे ते काय करेक्ट कार्यक्रम करतील, अशी टीकाही बावनकुळेंनी केली. त्यानंतर त्यांच्या या टीकेला आता अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
बावनकुळेंनी करेक्ट कार्यक्रम करू असं सांगितलं, तेव्हापासून मला झोपच येत नाहीये. आता राजकारणातून संन्यास घेतलेला बरा, असा खोचक टोला अजित पवार यांनी लगावला आहे.