वेदान्ता महाराष्ट्राबाहेर गेला, आम्ही तरुणांना काय उत्तर द्यायचं; अजित पवारांचं खडेबोल
![वेदान्ता महाराष्ट्राबाहेर गेला, आम्ही तरुणांना काय उत्तर द्यायचं; अजित पवारांचं खडेबोल ajit pawar](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/09/ajit-pawar.png)
बीड Ajit Pawar On Vedanta Foxconn : महाराष्ट्रातील लाखो लोकांना रोजगार पुरवू शकणारा वेदान्ता प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालेलं आहे. हा प्रकल्प राज्याबाहेर गेला कसा? यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. हा प्रकल्प महाविकास आघडीच्या सरकाच्या निष्क्रियतेमुळेच राज्याबाहेर गेल्याचा आरोप शिंदे फडणवीस सरकारमधील नेते करत आहेत. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली बाजू मांडली आहे.
“वेदान्ता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर कसा गेला? कोणामुळे गेला? ते तर प्रकल्प महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्रात उभारण्यासाठी प्रयत्न करतच होते. त्यावेळी त्यांना महाराष्ट्रात जागा जास्त आवडलेली होती. आज आम्ही तरुण-तरुणींना काय उत्तर द्यायचं. दीड लाख नोकऱ्या लागणार होत्या. आता यापेक्षा मोठा प्रकल्प आम्ही महाराष्ट्राला देऊ असं म्हणत आहेत. द्या ना. महाराष्ट्रात काय जागा कमी पडली आहे काय? हाही प्रकल्प द्या आणि अजून येत असतील तर तेही द्या.” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. ते बीड मध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
“प्रकाश आंबेडकर यांनी हा प्रकल्पाचा वाद अजित पवार यांनी उभा केल्याचा आरोप केला आहे. मी आमच्या सरकारच्या काळात एक काम हातात घेतलं तर ते तडीला कसं जाईल यासाठीचं प्रयत्न करायचो. प्रकाश आंबेडकर म्हणतात, राष्ट्रवादीने सत्तेत असताना फक्त साखर उद्योगाकडेच लक्ष दिले. त्यांना माहिती नाही का? राष्ट्रवादी १९९९ ला स्थापन झाल्यापासून २०१४ पर्यंत सत्तेत होतं. वेदान्ता महाराष्ट्राबाहेर कां गेला हे राज्यातल्या जनतेला माहिती आहे. पुण्यातील तळेगाव येथे निश्चित जागेची आणि गुजरात मध्ये ज्या ठिकाणी प्रकल्पासाठी जागा नियुक्त करण्यात आली आहे यांची तुलना करा” असंही अजित पवार यांनी म्हटलं हे.