जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “शरद पवार…”

मुंबई : Jitendra Awhad News राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad NCP) यांच्यावर ‘हर हर महादेव’ (har har mahadev) चित्रपटाच्या प्रकरणात गोंधळ केल्याने गुन्हा दाखल झाला होता. त्यांना अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणात त्यांना जामीन मिळालेला आहे. दरम्यान काहीच तासांनी त्यांच्यावार विनय भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर त्यांनी “पोलिसांकडून ७२ तासांत माझ्यावर विनाकारण दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकार पोलिसांच्या माध्यमातून माझ्यावर अत्याचार करत आहे. मी लढत राहणार आहे. मी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.” असं ट्वीट केलं आहे. त्यांच्या या ट्वीट नंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत. राजकीय वर्तुळात मोठ्या स्तरावर प्रतिक्रिया या प्रकरणात दिल्या जात आहेत. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले, “माझी पहिल्यांदा आव्हाडांना विनंती आहे. तयंनी राजीनामा वगैरे काही देण्याचा विचार देखील करू नये. राजकीय जीवनात काम करताना ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण काम करतो, शरद पवारांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वाखाली आपण काम करत आहोत. त्यांनी तर स्वत:च्या राजकीय जीवनात अनेकप्रकारे चढउतार पाहिले आहेत, अनेकप्रकारची स्थित्यंतरं पाहिलेली आहेत. कधी आपण सरकारमध्ये तर कधी विरोधी पक्षात आपण असतो, त्यामुळे अनेक घटना घडत असतात.”
“मध्यंतरी माझ्या स्वत:च्या पाहण्यात आलं, तो चित्रपट बंद पाडण्यासाठी गेले असताना ज्यांना मारहाण झाली, तेच म्हणाले की जितेंद्र आव्हाडांनी मला त्यात वाचवलं. असं असतानाही जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याचं काम झालं. रात्रभर एका पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं.” असंही ते म्हणाले.
दरम्यान, जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात अनेकांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. सरकार सत्तेचा गैरवापर करून विरोधकांच्या विरोधात खोट्या कारवाया करत असल्याचं विरोधक म्हणत आहेत. जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे.