आलिया भट्टच्या मंगळसूत्राची सगळीकडेच चर्चा

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा विवाह सोहळा १४ एप्रिलला मुंबईमध्ये पार पडला. सध्या या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. पण या सगळ्यासोबतच चर्चा होतेय ती आलियाचा वेडिंग लुक, मेकअप आणि मंगळसुत्राची. आलियाचं मंगळसुत्र खूपच खास आहे आणि विशेष म्हणजे त्याचं पती रणबीर कपूरशी तेवढंच खास कनेक्शन आहे. आलिया भट्टच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या मंगळसूत्रानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आलियानं खूपच नाजूक मंगळसूत्र घातलं होतं. पण या मंगळसूत्राच्या डिझाइनचं पती रणबीर कपूरशी मात्र खूप खास कनेक्शन आहे.
आलियाच्या मंगळसूत्रामध्ये इन्फिनिटीचं साइन आहे. जे सरळ केलं तर इंग्रजीतील ८ अंकासारखं दिसतं. सध्या आलियाच्या या मंगळसूत्राची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.रणबीर कपूरसाठी ८ हा अंक खूप खास आहे. तो त्याचा लकी नंबर आहे. या नंबरसाठी रणबीर किती पझेसिव्ह आहे, हे तर त्याच्या सर्वच चाहत्यांना माहीत आहे आणि आता रणबीरवर जीवापाड प्रेम करणारी आलियादेखील या नंबरला आपला लकी चार्म समजू लागली आहे. आलियाच्या या मंगळसूत्रामध्ये गोल्डची चेन, काळे मणी आणि यासोबत एक मोतीदेखील जोडण्यात आला आहे.
दरम्यान, आलियानं अनेकदा ८ अंकाच्या माध्यमातून रणबीरप्रती आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. कधी ८ नंबरची जर्सी घालून, तर कधी मोबाईल कव्हरवर ८ नंबर फ्लॉन्ट करत तिनं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. एवढंच नाही तर १३ एप्रिलला जेव्हा आलियाच्या मेंदीचा कार्यक्रम झाला तेव्हादेखील तिनं तिच्या मेंदीमध्ये ८ नंबर डिझाइन करून घेतला होता. यासोबतच रणबीरच्या नावाचं R हे इनिशियलही तिनं काढलं होतं.