माजी विद्यार्थिनींनी रंगवला मातृदिनाचा अद्भुत सोहळा!

पुणे : हुजूरपागा शाळेमध्ये मातृदिनाचे औचित्य साधून अगदी वेगळी संकल्पना घेऊन माजी विद्यार्थिनींनी रंगवलेला सोहळा खरोखरच अद्भुत ठरला! तसे पाहिले तर आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेत, हुजूरपागा शाळेतील १९७३ च्या अकरावी बॅचच्या सुमारे १०० मुली गेल्या काही वर्षांत व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारा एकत्र आल्या. गेल्या पाच वर्षांत अनेक वेळा एकत्र भेटत राहिल्या. अगदी लॉकडाऊनच्या काळातसुद्धा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्कात राहिल्या.
व्हॉट्सअॅपवर नुसतीच आभासी फुले आणि केक देण्यापेक्षा येथे आपल्या मैत्रिणींच्या वाढदिवसाला मैत्रिणींमधले गुण, आयुष्यातल्या वाटचालीचे महत्त्वाचे टप्पे काव्यात गुंफून शुभेच्छा दिल्या गेल्या. खरेतर सोशल मीडियावर येणारे सर्व काही अल्पजीवी असते. आजच्या शुभेच्छा महापुराचा उद्या मागमूसही राहात नाही. असे असताना या उत्साही मुलींनी अशा शुभेच्छा काव्याचे एक पुस्तक काढायचे ठरवले. सर्व जणींनी ही कल्पना उचलून धरली आणि नुसत्या काव्यमय शुभेच्छा नव्हे तर प्रत्येकीच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतील अशी चित्रे काढली गेली.
मग चार महिन्यांच्या प्रयत्नांनी सर्व १०० जणींचा समावेश असलेले “मैत्र कवितेचे” हे सुंदर काव्यात्मक पुस्तक तयार झाले. पुस्तक प्रकाशन सोहळा आणि दुसर्या दिवशी असलेल्या मातृदिनाचे औचित्य साधून मातृपूजनाचा झकास समारंभ आयोजित करण्यात आला. सध्या सुमारे पासष्ठ वर्षांच्या आणि त्यांच्या माता सरासरी ८५ ते नव्वदीत दोघींचाही उत्साह तरुणाईला लाजवेल असा होता.