बॅनरवार पेटला! ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजप-शिंदे गटाला सडेतोड प्रतिउत्तर..
नाशिक : (Ambadas Danve On Devendra Fadnavis) उद्धव ठाकरे यांची आज दि. 26 मार्च रोजी मालेगाव येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देश आणि राज्याच्या राजकारणावर काय भाष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्षाने या सभेसाठी दोन दिवसांपासून जोरदार तयारी करण्यात आली आहे. मात्र, ठाकरेंच्या समर्थनार्थ सभेचे मालेगावात मराठी आणि उर्दू भाषेत पोस्टर लावण्यात आले आहेत. यावरून शिंदे गट आणि भाजपकडून टीका करण्यात आली आहे.
दरम्यान, यावेळी शिवसेनेकडून जोरदार प्रतिउत्तर देण्यात आलं आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे फोटो पोस्ट केले आहेत. या टीकेला उत्तर देताना खासदार प्रियांका चतुर्वेदी, मनिषा कायंदे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. दानवे यांनी फेसबुकवर फडणवीसांचा एक फोटो पोस्ट केला आहे. यात फडणवीस मुस्लीम बांधवांच्या कार्यक्रमात बोलताना दिसत आहेत. ‘जिनके घर शीसे के बने होते हैं वो दुसरों पर पत्थर नही फेंकते…’ असं कॅप्शन दिलं आहे.
शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या टीकेलाही दानवे यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी थेट शिंदेंसह त्यांच्या समर्थक अनेक नेत्याचे फोटो उर्दू भाषेतील पोस्टर दिसत आहेत. जनाब एकनाथ शिंदे ये भी देख लो.. असं कॅप्शन दिलं आहे. तर खासदार चतुर्वेदी यांनी फडणवीस, शेलार, गडकरी या भाजप नेत्यांचे मुस्लीम बांधवांच्या कार्यक्रमात उपस्थिती लावलेले फोटो ट्विट केले आहेत. ते धर्म आणि भाषेच्या आधारावर द्वेष पसरतात, परंतु ते स्वतःच मतांसाठी कपडे बदलतात… याला म्हणतात, असं कॅप्शन दिलं आहे.
उर्दू भाषेत लागलेल्या बॅनरवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता. फडणवीस म्हणाले, अली जनाब वगैरे जे काही आहे ते उद्धव ठाकरेंना भूषणावह वाटतं का? हे त्यांना विचारा. उर्दू ही एक भाषा आहे, त्या भाषेमध्ये कोणी काही म्हटलं तर काही हरकत नाही. आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. पण आम्ही लांगुलचालनाच्या विरोधात आहोत. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन जर ते लांगुलचालन करत असतील तर त्यांना यांच उत्तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना द्यावं लागेल. त्यांच्या या टीकेमुळे शिवसेनेच्या अनेक शिलेदारांनी भाजप आणि शिंदे गटाला धारेवर धरलं.