गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान; म्हणाले, “कोरोना लसीकरण मोहीम संपताच…”

नवी दिल्ली | Big Statement Of Amit Shah – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठं विधान केलं आहे. करोना लसीकरण मोहीम संपताच नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू करणार असल्याचं अमित शाह यांनी जाहीर केलं आहे. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी अमित शाह यांच्या भेटीसाठी मंगळवारी संसदेत पोहोचले होते. अमित शाह यांच्या भेटीनंतर सुवेंदू अधिकारी यांनी अमित शाह यांनी हे आश्वासन दिलं असल्याची माहिती दिली.
सुवेंदू अधिकारी यांनी मंगळवारी संसद भवनात अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अमित शाह यांच्यासोबत पश्चिम बंगालमधील भाजपच्या कामकाजाबाबत तसंच समस्यांबाबत चर्चा केली. या भेटीनंतर बोलताना सुवेंदू अधिकारी यांनी, अमित शाह यांनी कोरोना लसीकरण मोहीम संपल्यानंतर प्रलंबित असलेला नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला जाईल असं आश्वासन दिल्याची माहिती दिली आहे.
सुवेंदू अधिकारी यांनी या भेटीत अमित शाह यांच्यासमोर सत्ताधारी तृणमूल काँग्रेससोबत सुरु असलेल्या राजकीय लढाईसंबंधीही अनेक मुद्दे मांडले. आपण अमित शाह यांच्याकडे भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई करण्यासाठी तृणमूलच्या 100 नेत्यांची यादी दिली असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.