
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कुणाचा कसा आणि कधी सहवास लाभायचा, हे मी काही सांगण्याची गरज नाही, परिणामी त्यांच्या अभूतपूर्व शिकवणीमुळे त्यांनी शिवसेनेत उभी फूट पाडून आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं आणि आता शिवसेनेच्या नेत्यांना तुमचं तुम्ही बघा आणि ठरवा, असा अर्धसत्य सल्ला देत नवाब मलिकांची सोबत करण्यासाठी खासदार निघून गेले.
संजय राऊत यांना ईडीची तीन दिवसांची कोठडी मिळाली. साडेतीन शहाणे होते शिवसेनाशाहीतील साडेतीन शहाण्यांपैकी तीन शहाणे ईडीच्या तुरुंगात गेले. एक दोन साडे माडे तीन करीत करीत सर्वच शहाणे अखेरीस ईडीच्या तुरुंगात दीर्घ काळ मुक्कामी जाण्याची वेळ आली आहे. मागील एक वर्षापासून या सगळ्यांची अगोदर कोण तुरुंगात जातो, याची जीवघेणी स्पर्धा लागली होती. अखेरीस या स्पर्धेचा शेवट काल शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला. त्यावेळी भाजपवासीयांना आणि अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेला हायसे वाटले आहे, असे शिंदे गटाचे आमदार म्हणत आहेत. कारण या सर्वांची जातकुळी भ्रष्टाचाराची होती, हे वास्तव कुणालाही नाकारता येणार नाही.
ईडीने महाराष्ट्रातील तीन शहाण्यांचा कोटा पूर्ण केला असला तरी दिल्लीचा कोटा अजूनही अपूर्ण आहे. कारण दिल्लीत आतापर्यंत माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचे सुपुत्र कार्ती हे दोन शहाणे तुरुंगवारी करून भ्रष्टाचाराच्या न्यायालयीन कचाट्यात सापडले आहेत, तर आणखी दीड शहाण्यांचा ईडीच्या चौकशीचा ससेमिरा काही केल्या सुटत नाही. मुंबई व दिल्लीत या शहाण्यांनी देशातील तमाम यंत्रणांना अंगठा दाखवून व जनतेला करोडो रुपयांना चुना लावण्याचा महापराक्रम अनेक वर्षांपासून चालवला होता. पण केंद्रात राजकीय सत्ताबदल झाला आणि ही खाबूगिरी करणाऱ्यांचा पोलखोल होत गेला. खासदार संजय राऊत यांनी मागील अडीच वर्षांपासून दररोजच्या दररोज काळा कोळसा उगाळण्यासाठी भाडोत्री मंडळी हाताशी धरून अखेर सरकारचा नव्हे, तर शिवसेनेचासुद्धा कडेलोट केला, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. अर्थात, अशा छोट्या प्रसंगातून शिवसेना बाहेर येईल, पण त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती असायला हवी!
खासदार संजय राऊत यांनी सातत्याने ईडीच्या नावाने शंखनाद सुरू केला होता. तो स्वत:च्याच अटकेचा, पण त्यांनी स्वत:हून आपला नाद पूर्ण केला. त्यामुळे म्हणतात, ना ‘मन चिंती ते वैरी ना चिंती’ या वाक्प्रचाराची महती कळाली. खासदार संजय राऊत यांनी आपण कसे धुतल्या तांदळासारखे निर्मळ आहोत, याचा आटापिटा करण्यासाठी याच वर्षातील व्हॅलेंटाईन डेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा फेब्रुवारीला शिवसेना भवनात भाडोत्री मराठी चॅनेलच्या पडद्यावर टिझरवर टिझर दाखवत अगदी मिनिटामिनिटाचा काऊंटडाऊन करत वाजतगाजत जगविख्यात पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकारांना कोणतेही प्रश्न विचारण्यासाठी साधी क्षणभर उसंत न देता जी मुक्ताफळे उधळली त्याचा शेवट काल त्यांना झालेल्या ईडीच्या अटकेने झाला.
आता आजपासून शिवसेनेला संयमी असा प्रवक्ता नव्हे, तर मुद्यावर बोलणारा एखादा पुरोगामी विचारांचा वारसा असलेला असा प्रवक्ता शोधावा लागणार आहे. तसा त्यांच्या मुखपत्राला कार्यकारी संपादकसुद्धा शोधणे क्रमप्राप्त आहे. अर्थात, यासाठी अगोदरच प्रयत्न झाले असतील किंवा तशी तयारी दस्तूरखुद्द खासदार संजय राऊत यांनी करूनसुद्धा ठेवली असेल असे वाटते.
तुरुंगातील मानसशास्त्र असे सांगते, की एखादा माणूस काही काळासाठी तुरुंगात गेला तर त्याच त्या वेळेपासून प्रतिदिनी तीन दिवसांनी आयुष्य कमी होते. पण तसे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याबाबतीत अजिबात किंचितसुद्धा होणार नाही, कारण मागील अनेक वर्षांपासून त्यांना कुणाचा कसा आणि कधी सहवास लाभायचा, हे मी काही सांगण्याची गरज नाही, परिणामी त्यांच्या अभूतपूर्व शिकवणीमुळे खासदार संजय राऊतांनी शिवसेनेत उभी फूट पाडून आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं आणि आता शिवसेनेच्या नेत्यांना तुमचं तुम्ही बघा आणि ठरवा, असा अर्धसत्य सल्ला देत नवाब मलिकांची सोबत करण्यासाठी खासदार निघून गेले. शरद पवार यांचे या घटनेवरून स्वीकारलेले मौन पुरेसे बोलके आहे.