अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; सचिन वाझे माफीचा साक्षीदार म्हणून कोर्टानं केलं घोषित

मुंबई | राज्याची माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. देशमुख यांच्याविरोधात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आलं आहे. सचिन वाझेंनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी दाखल केलेला अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं स्वीकारला आहे.
आज सचिन वाझेंना सीबीआयच्या विशेष कोर्टापुढे व्हीसीद्वारे हजर करण्यात आलं होतं. त्यामध्ये सचिन वाझेंना माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आलं आहे. ७ जूनच्या सुनावणीत वाझेला प्रत्यक्ष कोर्टापुढे हजर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत. आता या प्रकरणात सचिन वाझे नियमीत जामीनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी कथित भ्रष्टाचार प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी वाझेंनी विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल केला. तसंच सीबीआयने त्यांच्या अर्जाला सर्शत मंजुरी दिली आहे. या कथित प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य आरोपींविरोधात आपल्याकडे असलेली माहिती देण्याची तयारी सचिन वाझेंनी दाखवली आहे.