“…तोपर्यंत उभ्या महाराष्ट्रात भाजपचा कुठलाही नेता फिरू शकणार नाही”, शिवसेनेचा थेट इशारा

मुंबई | Arvind Sawant – कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. लोढांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसेनेनं लोढांना इयत्ता चौथीचं इतिहासाचं पुस्तक भेट देऊन इतिहास वाचा असा खोचक टोला लगावला आहे. तसंच यावेळी, जोपर्यंत भाजपचे (BJP) नेते छत्रपतींच्या अपमानाबद्दल पश्चाताप व्यक्त करत नाहीत, तोपर्यंत उभ्या महाराष्ट्रात यापुढे भाजपाचा कुठलाही नेता फिरू शकणार नाही, असा थेट इशाराही शिवसेनेनं दिला आहे.
अरविंद सावंत म्हणाले की, “महाराष्ट्राचा त्यांना अपमान करायचा आहे. त्यांनी आता जे वक्तव्य केलंय त्याबद्दल त्यांना माफी मागावीच लागेल. जोपर्यंत मंगलप्रभात लोढा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आज आम्ही लोढांना चौथीच्या इतिहासाचं पुस्तक भेट देत आहोत. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिलेला आहे. ज्यांना इतिहास माहिती नाही त्यांना आम्ही इतिहास शिकवत आहोत.”
“लोकांकडून जेव्हा संताप व्यक्त केला जातो तेव्हा हे आमच्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचं सांगतात. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही असंच म्हटलं की, राज्यपालांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. ते अनर्थ निर्माण करत आहेत. त्यांनी गद्दारांची तुलना शिवाजी महाराजांशी केली आहे. ते व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे,” असंही अरविंद सावंत म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “ते निर्लज्ज आहेत. त्यांना लाज वाटत नाही की, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेण्याची भाषा केली होती आणि आता त्यांचा अपमान करत आहेत. ते शब्दांचे खेळ करत आहेत. जोपर्यंत भाजपचे नेते छत्रपतींच्या अपमानाबद्दल पश्चाताप व्यक्त करत नाहीत तोपर्यंत उभ्या महाराष्ट्रात यापुढे भाजपचा कुठलाही नेता फिरू शकणार नाही. त्यांना याचे परिणाम भोगावेच लागतील”, असा इशाराही अरविंद सावंत यांनी दिला.