2014 मध्ये शिंदेंचा काँग्रेस-राष्ट्रवादीकडे सरकारसाठी प्रस्ताव; चव्हाणांच्या विधानामुळे शिंदेंची कोंडी!

नांदेड : (Ashok Chavan And Eknath Shinde) 2014-2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालीअस्तित्वात असलेलं भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळातच युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता. एकनाथ शिंदे यांचाही त्या शिष्टमंडळात समावेश होता, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसपक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केला.
भाजपसोबत आता राहायचे नाही ही शिवसेनेची भूमिका त्यापूर्वी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारच्या काळातच झाली होती. आपण, म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करू अशा आशयाचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे वरिष्ठ नेते ज्यात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता. या सर्वांनी माझी माझ्या मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती असे चव्हाण यांनी सांगितले.
अशा प्रकारचे सरकार स्थापन करायचे असल्यास तुम्ही आधी पवार साहेबांशी चर्चा करा असे मी या नेत्यांना सांगितले होते. परंतु ते पवार साहेबांना पुढे भेटले किंवा नाही याबाबत मला नंतर काहीही माहिती नाही असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. दोन महिन्यांपूर्वी राज्यातील महाविकास आघाडीत शिवसेनेची कोंडी होत आहे असे कारण सांगून शिवसेनेत बंड करणारे एकनाथ शिंदे यांना युती सरकारच्या काळात भारतीय जनता पक्षासोबत फारकत घ्यायची होती ही माहिती आजच्या राजकीय पार्श्वभूमीवर खळबळजनक आहे. यामुळे शिंदेंची कोंडी होण्याची दाट शक्यता आहे.