एक तरी ओवी अनुभवावी

प्रकाश पागनीस
।।जय श्री राम ।।
।।ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन ।।
।।अ.१३वा.”अज्ञान आणि
मूर्खता “।।
माऊलींनी निरक्षरतेला नावे ठेवली नाहीत. अज्ञानात चुकीचे ज्ञान घेणे येते ज्याला विपरीत ज्ञान म्हणतात. मूर्खतेत चुकीचे निर्णय घेणे उद्धटता येते. प्रस्तुत ओव्यांतून हेच निरूपण केले आहे.
अहो वसती धवळारे ।
मोडूनि देऊळ देव्हारें ।
नागौनि वेव्हारे । गवादी घातली ।।२३०।।
भावार्थ – आपल्या भागात मोठे देवालय हवे. असे पुढारी सामाजिक कार्यकर्त्यांना वाटून त्यांनी उंच मजल्यांची राहती वस्ती पाडली तर हे पुण्यकर्म न ठरता अनेकांना बेघर करण्याचे पापच होईल.
सावकारांसारखे अनेकांची अार्थिक फसवणूक करून जर कोणी गावजेवण घातले तर अन्नदानाचे पुण्य त्याला
मिळणार नाही.
मस्तक पांघुरविले ।
तवं तळवटी उघडे पडले ।
घर मोडोनि केले ।मांडव पुढे ।।२३१।।
भावार्थ – वेडी माणसे झोपतानासुद्धा डोके झाकले तर पाय उघडे टाकतात. अंगभर पांघरूण कसे घ्यावे त्यांना समजत नाही. घरात लग्न निघाले, घर माेडून वासे, खांब, तुळयांचा वापर करून अंगणात मांडव उभा करतात.
बैल विकोनि गोठा । पुंसा लावोनि गाठा ।
इया करणी की चेष्टा । काई हंसो ।।२३३।।
भावार्थ – एका मूर्ख माणसाने बैल विकून टाकला. मिळालेल्या पैशातून उत्तम गोठा बांधून घेतला.
आणखी एकाने पोपटाला आनंदित करण्यासाठी पिंजऱ्यातून स़ोडून दिले आणि नवीन पिंजरा विकत आणला तर अशा वेडाचाराला कुणालाही हसावेसे वाटणारच.
एकी धर्माचिया वाहणी ।
गाळु आदरीले पाणी ।
तव गाळितया आहाळणी ।
जीव मेले ।।२३४।।
भावार्थ – धर्मग्रंथात सांगितले आहे म्हणून काही पाणी गाळून घेतात. पण गाळणीने. अनेक सूक्ष्म कीटक मरून जातात.
एक न पचविती कण । इये हिंसेचे भेण ।
तेथ कदर्थले प्राण । हेचि हिंसा ।।२३५।।
भावार्थ- अन्न शिजवताना कीटक जीवाणू मरतात. असे म्हणून कोणी न शिजलेले अन्न खाऊ लागला तर पोट बिघडून मरण ओढवेल.मग प्राण जाणारी ही हिंसाच ठरेल ना?
एवं हिंसाची अहिंसा । कर्मकांडी हा ऐसा ।
सिद्धांतु सुमनसा । वोळखे तु ।।२३६।।
भावार्थ : हे सुमनाने विचार करणाऱ्या अर्जुना धर्माच्या कर्मकांडात जर हिंसेला प्रोत्साहन मिळत असेल तर अशा गोष्टींचे तू आचरण करू नकोस
।।आपणासि चिमोटा घेतला । तेणे जीव कासाविस झाला । आपणा सारखे पराला ओळखित जावे ।।