म्युझिक कॉन्सर्टदरम्यान कैलाश खेर यांच्यावर हल्ला

Attack on Kailash Kher : आपल्या आवाजामुळे प्रसिद्ध असणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कैलाश खेर (Kailash Kher) यांच्यावर कॉन्सर्टदरम्यान हल्ला झाला आहे. कैलाश खेर यांचं लाईव्ह कॉन्सर्ट सुरु असताना एका अज्ञात व्यक्तीने कैलाश खेर यांना पाण्याची बाटली फेकून मारली. ज्यामुळे कार्यक्रमात एकच खळबळ उडाली होती. कैलाश खेर (Kailash Kher) यांच्यावर हल्ला केल्यानंतर तात्काळ पोलिसांनी हल्ला करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. कर्नाटकमधील हम्पी (Hampi) रविवारी घडलेल्या प्रकरणामुळे कैलाश खेर यांचे चाहत्यांमधून संताप व्यक्त होताना दिसत आहे.
रविवारी 29 जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्यानंतर कैलाश खेर यांची प्रकृती सध्या कशी आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. रविवारी होणाऱ्या कॉन्सर्टची माहिती कैलाश खेर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.
नेमकं प्रकरण काय?
हम्पी महोत्सावाच्या निमित्ताने कर्नाटकमध्ये कैलाश खेर यांच्या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान उपस्थित असलेल्या मंडळींनी कैलाश यांच्याकडे कन्नड गाण्यांची मागणी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे खूप गोंधळ झाला आणि जमाव अनियंत्रित झाला. त्याचवेळी उपस्थित असलेल्यांपैकी एका व्यक्तीने कैलाश खेर यांच्यावर बाटल्या फेकून मारल्या. दरम्यान घटनास्थळी उपस्थित असेल्या पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलं आहे.