“लवकरच महाराष्ट्राचं वातावरण शिवसेनामय झालेलं दिसेल”

मुंबई | काल (गुरूवार) द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये संपूर्ण देश मुर्मूंकडे आशेने पाहतोय असं राऊतांनी म्हटलं आहे. तसंच घटनेची पायमल्ली होऊ नये ही जबाबदारी राष्ट्रपतींची आहे. त्याचबरोबर तुम्हाला लवकरच महाराष्ट्र शिवसेनामय झालेला दिसेल असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
यावेळी संजय राऊत म्हणाले, शिवसेनच्या शिवसंवाद यात्रेला शिवसैनिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा लावल्या जात आहेत. आम्ही शिवसेनेसोबत आहोत असं शिवसैनिकांकडून सांगण्यात येत आहे. लवकरच तुम्हाला महाराष्ट्राचं वातावरण शिवसेनामय झालेलं दिसेलं. तसंच उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत अशी माहिती देखील राऊतांनी दिली आहे.
देशभरातून राष्ट्रपतीपदासाठी मतदान झालं त्यामध्ये शिवसेनेचा खारीचा वाटा आहे याचा आम्हाला अभिमान आहे. तसंच घटनेची पायमल्ली होऊ नये हे काम राष्ट्रपतींनी केलं पाहिजे, त्याचबरोबर केंद्रीय यंत्रणांचा दुरूपयोग होत आहे. राजकीय दबावातून सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांच्या विरोधात अशा कारवाया केंद्र सरकारकडून केल्या जात आहेत अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे.