ताज्या बातम्यामहाराष्ट्र

रत्नजडित शब्दांचा अलंकार गळाला!

Baba Maharaj Satarkar | ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर आज (गुरूवार) आपल्या माऊलीकडे निघून गेले. गेल्या 80 वर्षापासून या सत्पुरुषाने ज्ञानेश्वरीतील आणि तुकाराम गाथेतील प्रत्येक रत्न शब्दाला शृंगार चढविला. प्रत्येक शब्दाला अलंकार गुंफले आणि हे अलंकार भागवत भक्तांच्या कंठावर विराजमान झाले.

संतश्रेष्ठ ज्ञानोबा, तुकोबारायांचा जयघोष हा त्रिखंडी निनादत होताच. परंतु आपल्या अमोघ रसाळ वाणीतून त्याची लयबद्धता कोट्यावधी सांप्रदायिकांच्या कंठी बाबा महाराजांनी रुळवली. त्यांचे ते सुश्राव्य चालीतील शब्द असे काही कानामध्ये रुजले गेले की मनी आणि कंठी ज्ञानोबा – तुकोबारायांचा जयघोष सतत गाजत राहिला. आणि तो आपल्या जीवनाचा एक भाग होऊन गेला. आपल्या अमोघ लयबद्ध वाणीतून बाबा महाराजांनी किर्तन बोलके केले. सहज सोपा शब्दार्थ, भावार्थ समाजातील संसारातील प्रपंचातील साध्या सोप्या उदाहरणांच्या दाखल्यातून बाबा महाराजांनी ते मांडले आणि सांप्रदायातील ‘ सेलिब्रिटी महाराज ‘ म्हणून ते जगविख्यात झाले.

वारकरी सांप्रदायांनी वैकुंठवासी सोनोपंत दांडेकर यांच्यापासून ते अनेक कीर्तनकार. अभ्यासक, संशोधक दिले. परंतु वारकऱ्यांचा सांप्रदायिकांचा एक वर्ग जोपासला जात असताना नवी पिढी या सांप्रदायिक क्षेत्रांमध्ये येण्याचे सर्वात मोठे श्रेय हे बाबा महाराजांना दिले पाहिजे. कारण त्यांनी परमार्थ सोपा केला, अध्यात्म सहज सुलभ केला, ज्ञानेश्वरीची ओवी सुश्राव्य केली, गाथा सोपी केली, आणि ती समजावून सांगितले. आधी शब्द , मग चाल , मग ते शब्द आणि मग त्यातील भाव कळायचा. अध्यात्माची ही संपूर्ण प्रक्रिया बाबा महाराजांनी सहज सुलभ पद्धतीने नव्या पिढीच्या सांप्रदायांमध्ये रुजवली.

मुंगी उडाली आकाशी पासून ते रुणझुण रे भ्रमरा किंवा अगदी साध्या-सोप्या रामकृष्ण हरीच्या तालावर ठेका धरणारे बाबा महाराज भान हरपून जायचे आणि समोरच्याला देखील ते पूर्णपणे आपल्या नादब्रह्मामध्ये घेऊन जायचे. बाबा महाराजांबद्दल अनेक आख्यायिका होत्या. संत पुरुषांना दोष दिले जातात, त्या पद्धतीने त्यांनाही दिले गेले. परंतु लाखो लोकांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून त्यांना केवळ शाकाहाराकडे नव्हे, तर संत प्रवृत्तीकडे नेण्याचे महानकार्य त्यांच्या दिक्षेतून चालले. हे नाकारता येणार नाही. बाबा महाराजांची दीक्षा ते अनेकांसाठी चेस्थेचा विषय असला तरी यातून एक सतप्रवृत्त समाज निर्माण झाला, आणि तो अध्यात्माकडे झुकला. किमान तो कु प्रवृत्तीपासून लांब राहिला. व्यसनांपासून लांब राहिला. हे मात्र कुणीही नाकारणार नाही.

बाबा महाराजांची आणि पंढरी संचार परिवाराचे संबंध अत्यंत मातृ-पितृ, सुह्रदयाचे होते. पंढरी संचारच्या अनेक दीपावली विशेष अंकाची प्रकाशन हे बाबा महाराजांनी केले. पंढरी संचारच्या प्रत्येक कार्यक्रमात आध्यात्मिक शक्ती स्थळ म्हणून बाबा महाराजांनी नेहमी साक्ष दिली. प्रत्येक कार्यक्रमातील त्यांची उपस्थिती ही फार महत्त्वाची ठेव होती.

बाळासाहेब बडवे आणि स्वर्गीय वा. ना . उत्पात या दोघांचा उल्लेख ते प्रत्येक कार्यक्रमात करत. पंढरपुरातच नव्हे, तर पंढरपुरातील बाहेरच्याही कार्यक्रमात ते सातत्याने पंढरपूरचा आणि येथील परंपरांचा उल्लेख करत. बडवे आणि उत्पात आले म्हणजे माझा देव्हारा सजला, असे ते म्हणत. सांप्रदायावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींवर, महाराजांनी नितांत प्रेम केले. जाती-धर्माची बंधने झुगारून सांप्रदायाला केवळ माऊली चिंतनामध्ये लावणारा अवलिया आज आपल्यातून निघून गेला. शब्दांचे सुवर्णालंकार गळाले, शब्द पोरके झाले, केवळ ही पिढी नव्हे, येणाऱ्या अनेक पिढ्या बाबा महाराजांच्या या नादब्रम्हामध्ये रमून आपली हरिभक्ती सिद्ध करतील, यात संदेह नाही.

– अनिरुद्ध बडवे

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये