“येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर…” बच्चू कडूंचा इशारा!

अमरावती : (Bachhu Kadu On Government Officers) अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला, त्यांना तत्काळ २५ टक्के अग्रिम विमा कंपन्यांनी देणे अत्यावश्यक होते, पण यात मोठा घोळ समोर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून देखील विमा कंपन्यांनी अग्रिम देण्याचे टाळले. येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर मुंबईत येऊन अधिकाऱ्यांचे तोंड रंगवू, असा इशारा सत्तारूढ गटातील आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यास विमा कंपन्यांनी टाळाटाळ चालवली असून विम्याच्या रकमेचे असमान वाटप होताना दिसत आहे. शेजारी-शेजारी शेती असूनही नुकसानभरपाईच्या रकमेत मोठी तफावत दिसून आली आहे. नुकसानीनंतर पूर्वसूचना देणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ २५ टक्के अग्रिम देणे आवश्यक होते. पण, ही रक्कम देण्यात आली नाही. यासंदर्भात संजय देशमुख यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात गुरुवारी ठिय्या आंदोलन सुरू केले.
दरम्यान, ८१ मंडळांमध्ये नुकसान भरपाई प्रस्तावित असताना विमा कंपनीने केवळ ९ मंडळे गृहीत धरल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षकांमार्फत प्रस्ताव पाठवून तोडगा काढला जाणार आहे. सुमारे १८ हजार शेतकऱ्यांना काही कारणांमुळे पूर्वसूचना देता आली नाही. त्यांचाही विचार केला जावा, अशी आमची मागणी आहे. येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास अधिकाऱ्यांचे तोंड रंगवू, असे बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.