नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीच्या टीकात्मक डॉक्युमेंट्रीचं JNUमध्ये स्क्रिनिंग होणार?

दिल्ली | केंद्र सरकारने शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून “इंडिया: द मोदी क्वेश्चन” (India: The Modi Question) या डॉक्युमेंट्रीच्या लिंक ब्लॉक करण्याचे आदेश दिले. परराष्ट्र मंत्रालयाने या डॉक्युमेंट्रीला ‘प्रोपगंडा पिस’ म्हटलंय. तसंच यात कोणतीही सत्यता नाही आणि यातून ब्रिटिश वसाहतवादी मानसिकतेचं दर्शन घडत आहे, असं म्हटलंय. तर, डॉक्युमेंट्रीच्या लिंक ब्लॉक केल्याने विरोधकांनी केंद्र सरकावर टीका केली.
हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांच्या गटाने 21 जानेवारी रोजी विद्यापीठात बीबीसीच्या (BBC Documentary) डॉक्युमेंट्रीचं स्क्रीनिंग आयोजित केले होते. त्यानंतर जेएनयूतील (JNU) विद्यार्थी संघटनेने ही डॉक्युमेंट्री जेएनयू विद्यापीठ परिसरातील त्यांच्या ऑफिसात दाखवण्याचं जाहीर केलं होत. मात्र विद्यापीठाने (JNU) आपल्या स्टुडंट युनियनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या बीबीसीच्या “इंडिया: द मोदी क्वेश्चन” (India: The Modi Question) डॉक्युमेंट्रीचं स्क्रीनिंग रद्द करण्यास सांगितलं आहे. डॉक्युमेंट्रीचा कार्यक्रम रद्द न केल्यास विद्यापीठाच्या नियमांनुसार शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्याचा इशाराही जेएनयू प्रशासनाने विद्यार्थ्यांना दिला आहे.
दरम्यान, असं म्हटलं जातंय की, डॉक्युमेंट्रीवर कायदेशीर बंदी घातली नसल्यामुळे ते स्क्रीनिंग करतील. मात्र जेएनयू प्रशासनाने सोमवारी एका अॅडव्हायजरीत म्हटलंय की, विद्यार्थी युनियनने या कार्यक्रमासाठी परवानगी घेतलेली नाही, त्यामुळे तो कार्यक्रम रद्द करावा. यामुळे तिथली शांतता भंग होण्याचा धोका आहे. या संदर्भात जेएनयू स्टुडंट्स युनियनच्या अध्यक्षा आयशी घोष यांना कॉल आणि मेसेज केला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.