बदलत्या वातावरणामुळे बेदाणा उत्पादनाला फटका

पुणे : राज्यात सांगली, सोलापूर, नाशिक, पुणे जिल्ह्यांत बेदाणा उत्पादन होते. सरासरी १ लाख ५० हजार टन बेदाणा उत्पादित होतो. कोरोनामुळे बाजारात द्राक्ष विक्री झाली नाही, त्यामुळे उत्पादन १ लाख ८० हजार टनांवर गेले होते. यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने बाजारात विक्री होणार्या, निर्यातक्षम द्राक्षांचा दर्जा घसरला. ही द्राक्षे विक्री होत नसल्याने व पुरेसा दर मिळत नसल्याने शेतकर्यांनी बेदाणा उत्पादन केला.
मात्र, हा बेदाणा दर्जेदार झाला नाही. बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे बेदाण्यांना अपेक्षित रंगही आला नाही, दरही चांगला मिळाला नाही. मार्च महिन्यात तयार झालेला बेदाणा चांगल्या दर्जाचा आहे. हा बेदाणा १८० ते २२० रु. किलो दराने विक्री होत आहे. दोन नंबर दर्जा असलेला बेदाणा १५०-१७० रु. विक्री होत आहे.
अतिवृष्टी, मॉन्सूनोतर पाऊस, वाढलेल्या थंडीचा परिणाम होऊन यंदा राज्यात बेदाणा उत्पादनात दहा ते अकरा टक्के घट झाली आहे. मागील वर्षी सरासरी १ लाख ८० हजार टन बेदाणा उत्पादन झाले होते, यंदा ते १ लाख ६० हजार टनांवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा बेदाणा उत्पादक अडचणीत आले आहेत.