भाजपचे मिशन २०२४! पंतप्रधान मोदी घेणार ४० प्रचारसभा?

नवी दिल्ली : भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यासाठी पक्षाने २०१९ मध्ये पराभव झालेल्या १४४ जागांवर लक्ष्य केंद्रीत केली आहे. या १४४ जागांपैकी ४० जागांवर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी ४० मोठ्या सभा घेतील. उर्वरित जागांवर भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासारखे बडे नेते मैदानता उतरणार असल्याचे समजते. या रणनितीमुळे भाजप पक्ष आता लवकरच प्रचार सभेत उतरणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा प्रवास योजना फेज-2 अंतर्गत भाजपने देशभरातील लोकसभेच्या १४४ कमकूवत किंवा पराभव झालेल्या जागांवर पीएम मोदींच्या सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने लोकसभेच्या या जागांची ४० क्लस्टर्समध्ये विभागणी केली आहे. पंतप्रधानांच्या ४० सभा सर्वच ४० क्लस्टर्समध्ये होतील. उर्वरित १०४ जागांवर भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व अन्य केंद्रीय मंत्री सभा घेऊन पक्षासाठी मते मागतील.
दरम्यान, पक्षाची ही रणनीती आहे की नेत्यांच्या दौऱ्यावेळी क्लस्टर प्रभारींना स्थानिक मोठ्या नेत्यांशी नियमित बैठका केल्या पाहिजे. तसेच भाजपच्या स्थानिक नाराज नेत्यांच्या तक्रारींवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा लागेल, अशीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दौऱ्यात कार्यकर्त्यांशी साधावा लागणार संवाद..
दौऱ्यात क्लस्टरच्या प्रभारी कॅबिनेट मंत्र्यांना स्थानिक धार्मिक नेते, संत व विविध समुदायाच्या स्थानिक नेत्यांना त्यांच्या घरी जाऊन भेटावे लागेल. स्थानिक सार्वजनिक उत्सव व परंपरांतही सक्रियपणे भाग घ्यावा लागेल. तसेच स्थानिक पातळीवर आयोजित होणाऱ्या इतर कार्यक्रमांनाही त्यांना हजेरी लावावी लागणार आहे.
संघाच्या सर्वच संबंधित संघटनांच्या स्थानिक पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांसोबतही त्यांना बैठक घ्यावी लागेल. याशिवाय स्थानिक प्रभावी मतदार विशेषतः वकील, डॉक्टर्स, प्राध्यापक, व्यापारी व अन्य व्यावसायिकांसोबतही त्यांना नियमित व्हर्च्युअल बैठका घ्याव्या लागतील.
सप्टेंबर महिन्यात नवी दिल्ली स्थित भाजप मुख्यालयात भाजपची आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या मुद्यावर एक महत्वाची बैठक झाली. त्यात पक्षाध्यक्ष जे पी नड्डा व केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पक्षाच्या नेत्यांसोबत भाजपसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या १४४ जागांवर विचार मंथन केले. सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्र्यांनी आपल्याकडे सोपवण्यात आलेल्या ३ ते ४ लोकसभा मतदार संघातील स्थितीचा अहवाल सादर केला होता.