भाजपाने वाचला उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्व विरोधी घटनांचा पाढा; व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “तुम्ही हिंदुत्व फक्त सोडलंच नाही, तर…”
![भाजपाने वाचला उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्व विरोधी घटनांचा पाढा; व्हिडीओ शेअर करत म्हणाले, "तुम्ही हिंदुत्व फक्त सोडलंच नाही, तर…" rashtrasanchar news 2023 03 28T180608.947](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/03/rashtrasanchar-news-2023-03-28T180608.947-780x470.jpg)
मुंबई | उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) मालेगावातील सभेनंतर भाजपने पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथे केलेल्या भाषणात राहुल गांधी यांना इशारा दिला होता. तसंच वीर सावरकर हे आमचं श्रद्धास्थान आहे आम्ही त्यांचा अपमान सहन करणार नाही असं राहुल गांधींना (Rahul Gandhi) उद्देशून म्हटलं आहे. त्यावेळी त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या सभेत असं आवाहन केलं होतं की, हिंदुत्वापासून दूर गेल्याची एकतरी घटना दाखवून द्या. ठाकरेंच्या याच विधानावर भाजपने बोट ठेवले आहे. भाजपकडून एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला असून, घटनांची यादी वाचत भाजपने ठाकरेंना सुनावलं आहे. महाराष्ट्र भाजपकडून एक व्हिडीओ प्रसारित करण्यात आला आहे. या व्हिडीओत उद्धव ठाकरेंच्या मालेगावातील सभेतील भाषणाचा संदर्भ असून, त्यावरून टीका करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही टीका केली. आम्ही वीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे नेमकं काय करणार? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे. तर महाराष्ट्र भाजपाने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कुठल्या घटनांवर ते गप्प राहिले याचा पाढाच भाजपाने वाचला आहे. तसंच तुमची सत्ता गेली म्हणूनच तुम्हाला वीर सावरकर यांची आठवण आली असंही भाजपाने म्हटलं आहे.
“नेहमीसारखी सहानुभूती मिळवण्याची केविलवाणी धडपड. पक्षातील लोकांनी उद्धव ठाकरेंच्या वागणुकीला, बदललेल्या भूमिकेला कंटाळून पक्ष सोडल्याने त्यांच्यात आलेली उद्विग्नता हे त्यांच्या भाषणाचे सार असते. मालेगावच्या सभेत त्यांनी आवाहन करत विचारलं की, मी हिंदुत्वापासून दूर झालोय अशी एक घटना तरी दाखवून द्या. या आवाहनानंतर त्यांना त्यांच्या सत्ताकाळात हिंदुत्वापासून ते दूर गेल्याच्या घटनांचा साक्षात्कार करणे आवश्यक आहे”, असं म्हणत भाजपने घटना सांगितल्या आहेत