भाजप कार्यकर्त्याच्या ‘त्या’ ट्विटवर उर्फी संतापली; म्हणाली, “राहुल गांधींचं…”
मुंबई | Urfi Javed – अभिनेत्री आणि माॅडेल उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या फॅशन स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या कपड्यांमुळे अनेकदा वादातही असते. तिला तिच्या कपड्यांवरून मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं. तसंच आता एका भाजप (BJP) कार्यकर्त्यानं राहुल गांधींना (Rahul Gandhi) ट्रोल करण्यासाठी उर्फी जावेदच्या नावाचा वापर केला आहे. सध्या राहुल गांधी टी-शर्टवर दिल्लीच्या थंडीत फीरत असल्याचा मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे. त्यावरून भाजप कार्यकर्त्यानं खोचक ट्विट केलं असून त्यामध्ये उर्फीचा देखील उल्लेख केला आहे. त्यामुळे उर्फी चांगलीच भडकली आहे. यावर तिनं आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर देखील दिलं आहे.
सध्या राहुल गांधी दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीतही टी-शर्टवर यात्रेमध्ये फिरत आहेत. त्यामुळे ‘राहुल गांधींना थंडी वाजत नाही का?’ असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. यामध्ये भाजपकडूनही टोलेबाजी केली जात आहे. यामध्ये दिनेश देसाई (Dinesh Desai) नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधींवर मिश्कील टिपण्णी केली आहे. तसंच हे ट्विटर अकाऊंट व्हेरिफाईड असून त्यावर भाजप कार्यकर्ता, मालधारी सेना गुजरात असं लिहिण्यात आलं आहे.
दिनेश देसाई यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “जर थंडीमध्ये फक्त एक टीशर्ट घातल्यामुळे राहुल गांधी भारताचे पंतप्रधान होण्यासाठी पात्र होणार असतील, तर मग उर्फी जावेद तर अमेरिकेची राष्ट्रपतीच असायला हवी”, असं खोक ट्विट त्यांनी केलं आहे.
दरम्यान, या ट्विटवर उर्फीनं प्रत्युत्तर दिलं आहे. “राहुल गांधींचं माहिती नाही, पण मी तुमच्यापेक्षा तरी नक्कीच चांगली राजकीय व्यक्ती होऊ शकते. माझ्या राज्यात एकाही महिलेचा तिच्या कपड्यांवरून अपमान केला जाणार नाही. तुमचा मुद्दा मांडण्यासाठी एका महिलेचा अपमान करणं अशा प्रकारचं राजकारण तुम्हाला करायचं आहे का?” असं ट्वीट उर्फीनं केलं आहे.
तसंच उर्फीनं या संभाषणाचा स्क्रीनशाॅट आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करत गुजरात भाजपला टॅग करून संताप व्यक्त केला आहे. “हे तुमचे राजकारणी आहेत का? काहीतरी चांगलं करा! अशा लोकांकडून महिलांना सुरक्षा पुरवण्याची अपेक्षा कशी करू शकतो आपण?” असा सवालही उर्फीनं विचारला आहे.
पुढे ट्विटरवर दिनेश देसाई यांनी उर्फीच्या ट्विटवर प्रत्युत्तर दिलं आहे. “भारताची संस्कृती किंवा महिलांचा सन्मान याच्याशी संबंधित महिलेचा काहीही संबंध नाही. आमच्यासाठी झाशीची राणी लक्ष्मीबाई प्रेरणास्रोत आहेत. तुमचे सोशल मीडिया फोटो आणि व्हिडीओ नाही”, असं ट्विट त्यांनी केलं आहे. त्यानंतर आता यावर उर्फी काय उत्तर देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. तसंच त्यांच्यात झालेलं हे संभाषण आता चर्चेचा विषय ठरत आहे.