देवेंद्र भाऊंनी आता तरी शहाणे व्हावे!
![देवेंद्र भाऊंनी आता तरी शहाणे व्हावे! 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/07/1-780x470.jpg)
‘Larger than other‘ च्या नादात गेल्या पाच वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाने (BJP) विचारधारेपेक्षा ‘समाज निहाय मतांचा गठ्ठा’ आणि ‘मास इफेक्ट’ (mass effect) या तत्त्वांकडे थोडा कल वळवला आणि अनेक लोकांचे इनकमिंग झाले. सांगोल्याचा श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) हा त्यातलाच एक! जो सोलापूर जिल्ह्याचा रहिवासी आहे, त्याला श्रीकांत देशमुख यांच्या कालचा प्रकाराने फारसे आश्चर्य वाटले नाही. कारण या व्यक्तीची प्रवृत्ती – प्रकृती नेमकी काय आहे? हे या भागातील गाव खात्यात वाढलेल्या माणसाला चांगलेच माहित आहे. अत्यंत टपोर, उनाड, तत्त्वहीन, कुठलाही वैचारिक बेस नसलेले अशा काही चुकार कार्यकर्ते राजकारणात पोसले जात असतात.
कुठल्या ना कुठल्या झाडांच्या ‘खोडावर बांडगुळ जगावे’ तसे ते जगत असतात. तत्त्वनिष्ठ राजकारणाच्या पठडीत त्यांना फारसे स्थानही नसते. सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्या सारख्या वैचारिक जडणघडणीतून राजकीय नेतृत्व देणाऱ्या तालुक्यात देखील ही कीड होतीच. याच तालुक्यातील गणपत आबांच्या रूपाने “चारित्र्याचा प्रकाश देणाऱ्या समयीच्या खालील हा अंधार” सर्वांना दिसत होता, पण त्या ‘काळोखाचा कपाळावर कलंक’ लावण्याचे पाप भाजपाने केले.
वैचारिक लढाई संपत जाते तेव्हा जात – गट – तट – धर्मभावना याचा आधार घ्यावा लागतो किंवा मर्कटलीला करणारा एखादा मरकट तरी पोसावा लागतो. दुर्दैवाने भारतीय जनता पक्षासारख्या वैचारिक पक्षाने देखील सत्ता सामर्थ्याच्या अपेक्षेने अशी काही माकडे पक्षांमध्ये आणली, त्यातीलच एक हे महाशय. वृत्तपत्रांच्या जाहिरातीचे पैसे बुडवण्यापासून ते फडणवीसांची भेट घालून देण्यापर्यंतच्या सुपाऱ्या घेईपर्यंत यांच्या मर्कटलीला चर्चेत होत्या.
कोथरूड (पुणे) च्या एका विश्वात्मक शिक्षण सम्राटाच्या जवळीकतेचे फोटोचे दाखले देत त्यांनाही बदनाम करत, जातीपातीचा आधारावर हे बांडगुळ जगत होतं. जिल्ह्यातील प्रस्थापितांच्या विरोधात किंवा एकगठ्ठा असणार्या एका समाजाच्या विरोधात अन्य बारा बलुतेदारांची तथाकथित एकी करण्याच्या नादात असे काही चित्र – विचित्र कार्यकर्ते देखील देवेन भाऊंनी गोळा केले.
तो भाजपाचा जिल्हाध्यक्ष झाला तेव्हाच सर्वांचे डोळे विस्फारले होते, पण जुन्या माणसांना सध्या भाजपात फारसा ‘आवाज’ नाही, हे देखील पुन्हा एकदा अधोरेखित झाले होते. हा व्यक्ती खरोखरच पक्षाकरता कधीच हितावह नव्हता, उलट देवेंद्रजींचा त्यांच्यावरील विश्वास हा श्रीकांतभाऊ करता वरदान आणि पक्षाकरता शापच ठरला होता.
अखेर पर्यंत ते त्यांच्या लक्षात आले नाही. आज पापाचा घडा भरला तो थेट देवेन भाऊच्या अंगावर ओतला गेला. ही नियुक्ती त्यांचीच होती. पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारातील तात्विक पक्ष निर्माण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, याचे भान त्यांनी विसरता कामा नये. सत्ता स्पर्धेकरता काही गोष्टी कराव्या लागतात हे जरी मान्य असले तरी अशी माणसे सत्तेच्या सोपानापर्यंत पोहोचवण्यात देखील तुमच्या उपयोगाची नाहीत. हा बुद्धिवाद्यांचा पक्ष आहे येथे मर्कट लिलांना स्थान नाही.
इस्लामपूरच्या ‘गोपि’लीला देखील एक दिवस अशाच अंगलट येण्याची शक्यता आहे. वेळीच शहाणे व्हावे, माकडांना आवरावे. अन्यथा तुमच्याही खुर्चीला आता ‘खुर्ची देणाऱ्यांची’च स्पर्धा आहे, हे नुकतेच समजून चुकले आहे.