‘एवढं झाल्यावर तरी राऊत बेताल, बिनबुडाचं वक्तव्य थांबवतील वाटलं, पण..’
मुंबई – Supreme Court On Maharashtra MLAs : शिवसेनेत शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन तयार झालेले आहेत आणि त्याला संजय राऊत यांचं बेताल वक्तव्य कारणीभूत असल्याचं शिंदे गटातील आणि भाजप पक्षातील नेते आरोप करत आहेत. उद्धव ठाकरेंबद्दल आम्हाला प्रेम आहे मात्र त्यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांमुळे आम्ही बंड करून बाहेर पडलो असं देखील शिंदे गटातील नेत्यांकडून विधानसभेत बोलण्यात आलं होतं.
दरम्यान, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी बंड केलेल्या शिंदे गटातील सोळा आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती त्यावर आज ( सोमवार ) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यात सोळा आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्या आमदारांबाबत सुनावणी होईपर्यंत कुठलीही कारवाई करू नये असे आदेश न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत.
न्यायालयाच्या भूमिकेनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात टीका टिपण्णी आणि क्रिया प्रतिक्रियांना वेग आलेला दिसत आहे. संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली होती. त्या टीकेला प्रतिक्रिया देत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाना साधला आहे. “मला वाटलं होतं, एवढं सगळं झाल्यानंतर तरी संजय राऊत बेताल आणि बिनबुडाचं वक्तव्य करणं बंद करतील पण त्यांना असंच वक्तव्य करण्यात स्वारस्य आहे असं वाटतंय. न्यायालयाचा निर्णय त्यांच्या बाजूनं लागला तर न्यायालयाचा उदोउदो करायचा आणि आमच्या बाजूनं लागला तर न्यायालयावर ताशेरे ओढायचे हा संजय राऊत यांचा दुटप्पीपणा आहे.” न्यायालयाच्या निकालाबाबत चुकीचं बोलणे हा न्यायालयाचा अवमान असल्याचंही दरेकर यांनी म्हटलं आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर संजय राऊत यांनी ‘हे सरकार थोपवण्यात आलेलं असून बेकायदेशीर आहे. संविधानानुसार हे सरकार स्थापन करण्यात आलं नसल्याचं संजय राऊत म्हटले होते. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आमची बाजू देखील भक्कम असल्याचं संजय राऊत म्हटले होते.