‘रक्ताचे नाते ट्रस्ट’ने जपले सामाजिक नाते
![‘रक्ताचे नाते ट्रस्ट’ने जपले सामाजिक नाते soniya gandhi 2](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/soniya-gandhi-2-780x470.jpg)
५० मुलांना शालेय साहित्य व दप्तरांची भेट
अनेक मुला-मुलींना शिकायला मिळत नाही. मात्र, सामाजिक संस्थेत असलेल्या मुला-मुलींना अनेक सुविधा मिळतात. त्यांनी या संधीचे सोने करायला हवे. आयुष्य मोठे व सुंदर आहे, फक्त आपल्याला ते जगता आले पाहिजे.
पुणे ः आयुष्यात शिक्षण महत्वाचे असून मोठे होत यशस्वी होण्याकरीता प्रत्येकाने शिक्षणाचे धडे गिरवायला हवेत, असे मत सामाजिक कार्यकर्ते व रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बांगड यांनी व्यक्त केले. गुरुवार पेठेतील हिंद युवक मित्रमंडळ व सेवा सहयोगतर्फे देणे समाजाचे या उपक्रमांतर्गत सिंहगड पायथा डोणजे येथील ‘आपलं घर’ संस्थेतील ५० मुला-मुलींना शालेय साहित्य व दप्तरांची भेट देण्यात आली. यावेळी ‘आपलं घर’ संस्थेचे विजय फळणीकर, जितेंद्र गायकवाड, यशवंत लायगुडे यांसह केतन भागवत, मनिष शिंदे, अथर्व इंदलकर, रोहित शिंदे, सचिन चौधरी, रोहन शिंदे, रमेश चोरगे, शुभम दातरंगे, सिद्धार्थ काटे, मनोज शेलार दीपक बडे आदी उपस्थित होते.
डोणजे येथील ‘आपलं घर’ संस्थेप्रमाणेच खराडी येथील संतुलन संस्थेतील दगडखाण कामगारांच्या ५० मुलांना देखील शालेय साहित्य, दप्तरे, धान्य, खाऊ देण्यात आले. या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, किरण सोनीवाल, स्मरण थोरात यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी राम बांगड म्हणाले, शालेय वयातच मुलांनी मिळालेल्या चांगल्या संधीचा फायदा घ्यायला हवा. प्रयत्न, मेहनत केली, तर मोठं होता येते. प्रत्येक मुलाचा शारिरीक व मानसिक विकास गरजेचा आहे. त्याकरिता अभ्यासासोबतच व्यायामही महत्वाचा आहे. यावेळी मार्गदर्शन करताना केतन भागवत म्हणाले, मन स्वच्छ असेल आणि प्रयत्न प्रामाणिक असतील, तर आपल्या हातून सामाजिक कार्य घडते.
ज्याप्रमाणे आपण आई-वडिलांसाठी करतो, त्याप्रमाणेच सामाजिक संस्थांकरिता आपण काम करायला हवे. समाजासाठी काहीतरी करायचे हा विचार प्रत्येकामध्ये रुजायला हवा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी विजय फळणीकर यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.