सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ ठरला चौथा सर्वोत्तम ओपनिंग करणारा चित्रपट; जाणून घ्या पहिल्या दिवशीची कमाई

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : सलमान खानचा (Salman Khan) या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) आज रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. सलमानचा हा चित्रपट ईदच्या एक दिवस आधी रिलीज झाला. गेल्या अनेक महिन्यांपासून या सिनेमाची फार चर्चा होत होती. ईद आधीच प्रदर्शित झाल्यामुळे हा चित्रपट पहिल्याच दिवशी थोडा अडचणीत अडकला असला तरी चाहत्यांनी भाईजानचा मान राखला आहे. बॉक्स ऑफिसवर कोरोना महामारीनंतर हा चौथा सर्वोत्तम ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपट रिलीज होताच सलमानच्या चाहते सगळीकडे जल्लोष करताना दिसले.
कोरोना महामारीनंतर प्रदर्शित झालेले ‘पठाण’, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘सूर्यवंशी’ नंतर, ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या ओपनिंगला मॉर्निंग शोमध्ये ३० ते ४० टक्के सीटवर प्रेक्षक दिसले आहेत. चित्रपटाची आगाऊ बुकिंग फारशी चांगली नसल्यामुळे चित्रपटगृहे नक्कीच रिकामी होती, मात्र स्पॉट बुकिंगचा फायदा चित्रपटाला झाला आहे. तर शनिवारी ईदच्या निमित्ताने आता बंपर कमाई निश्चित आहे. जाणून घेऊया पहिल्या दिवशी या चित्रपटाने किती कमाई केलीये.
पहिल्याच दिवशी सलमानच्या ‘किसी का भाई किसी का जान’ चित्रपटाने इतर चित्रपटांचा धुरळा उडवला आहे. सलमानच्या आधी अजय देवगणचा भोला चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळू शकला नाही. नुकताच प्रदर्शित झालेला सामंथा रूथ प्रभूचा ‘शाकुंतलम’ देखील रांगेत होता मात्र त्याच्याकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवलीये. आता सलमानच्या चित्रपटाने सगळ्यांना दे धक्का करत पुढे स्थान पटकावलं आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 12 कोटींची कमाई केली आहे. 12.50 कोटींची कमाई करणारा सलमानचा ‘किसी का भाई किसी का जान’ हा चित्रपट त्याचा आजवरचा सर्वाधिक कमी ओपनिंग करणारा चित्रपट मानला जातोय. मात्र त्याच्या आधीच्या चित्रपटांच्या मानाने हा चित्रपट चांगली कमाई करेल असं म्हटलं जातंय.