खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या पोरा-पोरींनी केली सुवर्ण कामगिरी!
![खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या पोरा-पोरींनी केली सुवर्ण कामगिरी! khelo india 1 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/khelo-india-1-1-780x470.jpg)
मुंबई | Khelo India Games- खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यानी कांस्य आणि रौप्य पदकांसह सुवर्ण पदकांना देखील गवसणी घातली आहे. खेलो इंडिया २०२२ स्पर्धा ही स्पर्धा हरियाणा येथील पंचकुला या ठिकाणी सुरू आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी सुरू ठेवली असून आज देखील महाराष्ट्राच्या मुलांसह मुलींच्या खो-खो संघानं सुवर्णपदक पटकावलं आहे.
विशेष म्हणजे दोन्ही संघांनी अंतिम सामन्यात ओरिसाच्या संघाला पराभूत केलं आहे. तसंच मुलींच्या स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर पंजाब आणि पश्चिम बंगाल राहिला आहे. तर मुलांमध्ये पश्चिम बंगाल आणि दिल्लीला कांस्यपदक मिळालं आहे. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राच्या खो-खो संघांनी सुवर्ण पदक पटकावत स्पर्धेचा शेवट गोड केला आहे.
मुलींचा अंतिम सामना ओरिसासोबत झाला. या सामन्यात महाराष्ट्राने ८-६, ७-९, ६-५ अशा फरकानं २१ विरुद्ध २० च्या गुणांनी विजय मिळवला आहे. सुरुवातीपासून ओरिसाने महाराष्ट्राला चांगली लढत दिली. मात्र शेवटच्या 20 सेकंदात महाराष्ट्राच्या मुलींनी कमाल केली. सामना संपण्यासाठी एक मिनिट बाकी असताना श्रेया पाटीलने नाबाद खेळी केली. अगदी 20 सेकंद उरली असताना अटीतटीचा प्रसंग ओढावला होता. परंतु तिनं उत्कृष्टपणे नाबाद खेळी करून महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. या दमदार विजयानंतर महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी जय भवानी जय शिवाजी असा जयघोष केला. त्यानंतर महाराष्ट्राने आणलेल्या ढोलाच्या तालावर खेळाडूंनी नाच देखील केला.