पदके गंगेत विसर्जित करण्याच्या कुस्तीपटूंच्या निर्णयावर ब्रिजभूषण सिंह यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हा त्यांचा…”
![पदके गंगेत विसर्जित करण्याच्या कुस्तीपटूंच्या निर्णयावर ब्रिजभूषण सिंह यांची प्रतिक्रिया; म्हणाले, "हा त्यांचा..." westlers brij bhushan singh](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/05/westlers-brij-bhushan-singh-780x470.jpg)
नवी दिल्ली | Brij Bhushan Singh – काल (30 मे) कुस्तीगीर आंदोलकांनी (Wrestlers Protest) एक मोठा निर्णय घेतला होता. देशासाठी मिळवलेले मेडल कुस्तीपटू गंगेमध्ये विसर्जित करणार होते. केंद्र सरकारचा निषेध म्हणून आणि ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी कुस्तीपटूंनी हे पाऊल उचलत असल्याचं सांगितलं होतं. मात्र, भारतीय किसान संघटनेनं समजूत घातल्यानंतर कुस्तीपटूंनी त्यांचा हा निर्णय मागे घेतला. तसंच यावेळी कुस्तीपटूंनी सरकारला ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील कारवाईबाबत निर्णय घेण्यासाठी पाच दिवसांची मुदत दिली आहे. या दरम्यान, याबाबत आता ब्रिजभूषण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, “कुस्तीपटूंनी माझ्यावर जे आरोप केले आहेत त्याप्रकरणी पोलिसांनी माझी चौकशी केलेली आहे. तसंच या प्रकरणाची दिल्ली पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. जर या आरोपांमध्ये काही तथ्य असेल तर मला अटक होईल.”
“महिला कुस्तीपटूंनी गंगेत त्यांची पदके विसर्जित करण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांना सर्वस्वी वैयक्तिक निर्णय होता. तसंच कुस्तीपटू त्यांची पदके गंगेत विसर्जित करण्यासाठी हरिद्वारला गेले. पण त्यानंतर त्यांनी ती राकेश टीकैत यांच्याकडे सोपवली. ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. त्याला आम्ही काय करू?”, असंही ब्रिजभूषण सिंह म्हणाले.