क्राईमताज्या बातम्या

खळबळजनक! ‘सरल वास्तू’चे चंद्रशेखर गुरूजी यांची निर्घृण हत्या

कर्नाटक | कर्नाटकातील हुबळी येथे धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘सरल वास्तू’चे संस्थापक चंद्रशेखर गुरुजी यांच्या हत्येचं वृत्त हाती येत आहे. चंद्रशेखर गुरुजी यांची चाकूचे सपासप वार करुन हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हॉटेलच्या रिसेप्शनजवळ त्यांची चाकूनं वार करत हत्या केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (मंगळवार) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हत्या करण्यात आली. दिवसाढवळ्या हॅाटेलमध्ये हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अनुयायी म्हणून उभे असलेल्या व्यक्तींनी गुरुजींवर हल्ला केला. हल्ल्यानंतर दोघेही तिथून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. तसंच चंद्रशेखर गुरुजी यांच्या हत्येचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओनुसार, हॉटेलच्या लॉबीत दोन कथित अनुयायांनी चंद्रशेखर गुरुजी यांचे चरण स्पर्श केले. त्यानंतर त्यांनी गुरुजीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यानंतर हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला. या गोंधळातच हल्लेखोर पसार झाले. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच चंद्रशेखर यांच्या विरोधात काही कर्मचाऱ्यांनी आपल्या थकित पगारासाठी धरणं आंदोलन केलं होतं. त्यापैकी काही कर्मचाऱ्यांचा यात काही सहभाग आहे का, या अनुषंगानेही पोलीस तपास करत आहेत. चंद्रशेखर गुरुजी हे तीन जुलैपासून हुबळीतील हॉटेलमध्ये वास्तव्य करत होते. त्यांच्या कुटुंबातील एका लहान मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानिमित्ताने ते हुबळी येथे गेले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांनीही घटनास्थळी धाव घेतली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये