पाच दिवसांत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता
![पाच दिवसांत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता Satellite Image India 05 June 2022 00 00](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/Satellite-Image-India-05-June-2022-00_00-780x470.jpg)
मुंबई : राज्यात सध्या उष्णतेची लाट आली असून त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. अशातच हवामान खात्याने मॉन्सूनबाबत काहीसा दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. येत्या ५ दिवसांत राज्यात अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उष्णतेमुळे पुणेकर हैराण…
पुण्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानाला केवळ हवामानातील बदल कारणीभूत नसून, शहरातील ‘उष्णतेची बेटं’ जबाबदार ठरत आहेत. वाढत्या काँक्रिटीकरणाचा परिणाम शहरातील तापमानावर झाला असून, उपनगरांमधील तापमानात चार ते पाच अंशांपर्यंत जास्त आकडे दिसत आहेत. हडपसर, नगर रस्ता, खराडी, बाणेर अगदी कोथरूडमधील काही भागांतही ते अधिक नोंदवले जात आहे. भौगोलिक रचनेनुसार अनेक ठिकाणी ‘उष्णतेची नैसर्गिक बेटे’ आहेत. प्रामुख्याने खडकाळ प्रदेश, पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या भागात ही बेटे बघायला मिळतात. याचा मानवी आरोग्यावरही दुष्परिणाम होत असून, डोकेदुखी, थकवा आणि उष्माघाताच्या तक्रारी या भागात जास्त असतात.
राज्यात यंदा मॉन्सून लवकर दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, मॉन्सूनला पुढे सरकरण्यासाठी अनुकूल वातावरण नसल्याने मॉन्सून कर्नाटकमधील कारवारपर्यंत येऊन थांबला आहे. नैर्ऋत्य मोसमी वार्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाल्यामुळे मॉन्सून कर्नाटकातच थबकल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पुढील ५ दिवसांत राज्यातील अनेक भागात जोरदार मॉन्सूनपूर्व सरी बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, विदर्भ, मराठवाडा उत्तर महाराष्ट्रासह इतरही अनेक भागांत उष्णतेची लाट ही कायम राहणार आहे.
केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन
केरळमध्ये मॉन्सूनने २९ मे रोजी प्रवेश केला आहे. त्यानंतर ३१ मे रोजी मॉन्सून कर्नाटकच्या कारवारपर्यंत येऊन ठेवला आहे. गोव्यापासून काही अंतरावर असताना पोषक वातावरणामुळे तो केवळ दोन दिवसांत केरळमध्ये पोहोचेल, असे भाकीत हवामान विभागाने केले होते. पण अचानक हवामानात झालेल्या बदलामुळे नैर्ऋत्य मोसमी वार्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून मॉन्सून कर्नाटकच्या कारवारमध्येच थांबला आहे, तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण असल्याने लगतच्या बहुतांश भागांत मॉन्सूनने प्रवेश केला आहे.
पश्चिम बंगालच्या काही शहरांसह, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या काही भागांत मॉन्सून दाखल झाला आहे. याशिवाय, मेघालयमध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रातून येणार्या बाष्ययुक्त वार्यांमुळे कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप, तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या काही भागांतही पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात फक्त ३० मिनिटे झालेल्या पावसाने अक्षरश: थरकाप उडाला. पावसाची भयानकता इतकी होती, फक्त ३० मिनिटांत दाणादाण उडवून दिली. अनेक ठिकाणी घरांची छपरे उद्ध्वस्त झाली, तर पत्र्याचे शेड
उद्ध्वस्त झाले.