ताज्या बातम्यारणधुमाळी

‘…या सगळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कारणीभूत’; राणा दाम्पत्यावरील कारवाईनंतर नारायण राणेंची प्रतिक्रिया

पुणे : रवी राणा आणि नवनीत राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांच्याविरोधात शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले होते. शनिवारी दिवसभर शिवसेना कार्यकर्ते मातोश्रीबाहेर आणि राणा दाम्पत्याच्या घराबाहेर ठाण मांडून बसले होते. अखेर दुपारी मातोश्रीवर न जाताच आंदोलन संपवत असल्याचं राणा दाम्पत्यानं जाहीर केलं. मात्र, यानंतर त्यांना अटक करण्यात आली असून आता त्यांची रवानगी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ते आज पुण्यात बोलत होते.

“जेव्हा राज्य सरकार कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित सांभाळत नाही. सुडाचं राजकारण करतात. अशा परिस्थितीत राज्यात राष्ट्रपती राजवट राज्यात येणं गरजेचं आहे”, असं नारायण राणे म्हणाले.

तसंच नारायण राणेंनी किरीट सोमय्यांच्या गाडीवर शनिवारी रात्री झालेल्या दगडफेकप्रकरणी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “राज्यात बेबंदशाही चालू आहे. जे सत्तेत आहेत, ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत त्यांचेच कार्यकर्ते धांगडधिंगा, मारझोड करत आहेत. एका व्यक्तीला मारायला ७०-८० लोक येतात. तेही एक राजकीय पुढारी आहेत. किरीट सोमय्या पोलीस स्थानताच्या आवारात असताना ७०-८० लोक त्यांच्यावर पोलिसांच्या साक्षीनं दगडफेक करतात. कसला कायदा आणि सुव्यवस्था?” असं राणे म्हणाले आहेत.

पुढे राणे म्हणाले, “देशात लोकशाही आहे. ते जर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी पुढे येत असतील, तर त्याला विरोध का? शरद पवारांच्या घरावर हल्ला झाला, तेव्हा किती एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली. मग अमरावतीमध्ये राणांच्या घरात घुसून मारहाण झाली. तेव्हा त्यांना का अटक होत नाही? तीच कलमं का लावली जात नाहीत? एका व्यक्तीला एक कायदा आणि दुसऱ्याला दुसरा असं का? हा पक्षपात सरकार का करतंय? या सगळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कारणीभूत आहेत. त्यांचं कुणावरही नियंत्रण नाही”.

“उद्धव ठाकरे कधीच राज्य चालवण्यासाठी सक्षम नव्हते. त्यांना प्रशासन माहिती नाही, राज्याचे प्रश्न माहिती नाहीत. कधी ते गेल्या दोन वर्षांत मंत्रालयात गेले नाहीत. कॅबिनेटला बसत नाहीत. परवा एक भाषण केलं. अंतिम आठवडा प्रस्तावावेळी. कलानगरच्या नाक्यावर बोलतात तसे ते सभागृहात बोलले. या राज्याला मुख्यमंत्र्यांनी विकासाच्या बाबतीत १० वर्ष मागे नेलं. ८९ हजार कोटी राजकोषीय तूट या राज्याची आहे”, अशा शब्दांत नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये