श्रीलंकेनंतर आता चीनचा नंबर?

आर्थिक आणीबाणी : बँकांच्या रक्षणासाठी रणगाडे तैनात
नवी दिल्ली : श्रीलंकेमध्ये सध्या आर्थिक आणीबाणी जाहीर करण्यात आली. महागाईमुळे तेथील जनता अत्यंत त्रासलेली आहे. त्यामुळे नागरिक सरकारविरुद्ध आंदोलन करत आहे. श्रीलंकेचे नवे अध्यक्ष म्हणून रानिल विक्रमसिंघे यांची निवड झाली आहे. मात्र आता श्रीलंकेनंतर चीनमध्ये आर्थिक आणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण चीनमध्ये बँकांच्या सुरक्षितेतसाठी रणगाडे तैनात करण्यात आले आहेत. चीनमध्ये देखील आर्थिक आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. चीनमधून समोर आलेल्या व्हिडीओवरून असा दावा करण्यात आला आहे. चीनमधील बँकिंग क्षेत्रावर मोठं संकट आले असून, चीनमधील बँकांनी ग्राहकांची खाती गोठवली आहेत. याच्या निषेधार्थ लोक रस्त्यावर उतरले आहेत. चीनमधील परिस्थिती एवढी बिकट झाली की, सरकारला बँकांच्या बाहेर रणगाडे तैनात करावे लागले आहेत.
ग्राहकांना पैसे काढण्यापासून रोखण्याच्या बँकांच्या निर्णयाविरोधात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने झाली आहेत. चीनच्या हेनान प्रांतात गेल्या अनेक आठवड्यांपासून पोलिस आणि नागरिकांमध्ये संघर्ष सुरू आहे. चीनमध्ये ही परिस्थिती यावर्षी एप्रिलपासून निर्माण झाल्याचे समजते. एप्रिलपासून बँकांनी ग्राहकांना त्यांची बचत काढण्यापासून रोखण्यास सुरुवात केली आहे. चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) चे रणगाडे आंदोलकांना घाबरवण्यासाठी रस्त्यावर तैनात केले आहेत. दरम्यान एप्रिल २०२२ मध्ये साउथ चायना मॉर्निंंग पोस्टमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनंतर चीनमध्ये आर्थिक अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले. चायना मॉर्निंंग पोस्टने चीनमधील बँक घोटाळा उघड केला होता. चायनीज बँकांमधून ४० अब्ज युआन गायब झाल्याचा दावा बातमीत करण्यात आला होता. यानंतर चीनच्या हेनान आणि अनहुई प्रांतातील बँकांमधून पैसे काढण्यावरही बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
दुसरीकडे सिस्टम अपग्रेडचे कारण देत बँकांनी ग्राहकांना खात्यातून पैसे काढण्यास प्रतिबंध केल्याचे बँकांनी म्हटले आहे. दरम्यान, श्रीलंकेमध्ये देखील अशाच प्रकारे आर्थिक आणीबाणीला सुरुवात झाली होती. राष्ट्र्पती म्हणून रानिल विक्रमसिंघे यांची निवड झाल्यावर त्यांनी अर्थव्यवस्थेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. देशाच्या शासकीय प्रणालीत बदल घडवून आणण्याचा निर्धार करत आपण राजपक्षे कुटुंबाचे नाही तर जनतेचे मित्र आहोत, अशी ग्वाही आज श्रीलंकेचे नवे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी दिली. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत मे महिन्यात पंतप्रधानपद स्वीकारणारे ७३ वर्षीय रानिल विक्रमसिंघे यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली.