“काही लोकांना वाटलं आमच्या विकेट धडाधड पडतील मात्र मला…”, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

नागपूर | Eknath Shinde On Uddhav Thackeray – सध्या राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. काल (21 डिसेंबर) सायंकाळी नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सत्ता वगैरे असतानाही आम्ही बंड केलं त्यावेळी काही लोकांना वाटलं की यांचा कार्यक्रम झाला, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
एकनाथ शिंदे म्हणाले की, “सत्ता आणि सगळ्या गोष्टी असतानाही आम्ही बंड केलं. पुढे काय होईल याची बऱ्याच लोकांना चिंता होती. इतर बरेच लोक माझ्याबरोबर येणाऱ्यांना पण विचारत होते. बऱ्याच लोकांना काय होणार याची उत्सुकता लागली होती. काही लोकांना वाटलं ही यांचा कार्यक्रम झाला. यांच्या विकेट धडाधड पडतील. मात्र, मला एकदम कॉनफिडन्स होता. विश्वास होता की जी आम्ही भूमिका घेतली आहे ती बाळासाहेबांच्या विचारांची असून योग्य आहे. आम्ही कुठंही चुकीचं काम करत नाही”.
“आम्ही सत्ता किंवा मुख्यमंत्रीपदासाठी हे बंड केलेलं नाही. सत्ता मिळावी किंवा मुख्यमंत्रीपद मिळावं ही भावना आमच्या मनामध्ये नव्हती. परंतु महाराष्ट्रात सामान्य लोकांना न्याय देण्याचं काम आम्हाला करायचं आहे,” असंही एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
पुढे पत्रकारानं प्रश्नादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) उल्लेख केला. यालाच उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी ठाकरे सरकारवर टीका केली. “तुम्ही देवेंद्रजींचा उल्लेख केला. ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या मंत्रीमंडळात मी मंत्री होतो. मी त्यांच्या कामाची पद्धत पाहिलेली आहे. त्यांनी कुठल्याही सूडबुद्धीनं, सूड भावनेनं, आकसापोटी काम केलेलं नाही. मात्र. जेव्हा ते सत्तेत नव्हते तेव्हा सत्तेत असणाऱ्यांनी त्यांच्याबद्दल खूप वाईट विचार केला. पण त्यांना ती संधी मी मिळू दिली नाही. मी सत्तांतरच करुन टाकलं,” असं शिंदेंनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.