ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“राहुल शेवाळेंनी केलेल्या आरोपांना शुद्ध मराठी भाषेत…”, संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई | Sanjay Raut – शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात आदित्य ठाकरेंचा समावेश असल्याचा आरोप राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी केला आहे. रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने 44 कॉल आले होते. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असं बिहार पोलिसांनी सांगितलं आहे, असा गंभीर आरोप राहुल शेवाळेंनी लोकसभेत बोलताना केला होता. शेवाळेंनी केलेल्या या आरोपावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, “ज्यांच्यावर स्वत:वरच बलात्कारापासून विनयभंगाचा आरोप आहे, जो कालपर्यंत शिवसेनेच्या ताटत जेवत होता अशा व्यक्तीनं आदित्य ठाकरेंवर असे आरोप केले आहेत. याचा अर्थ जे फुटीर लोक आहेत ते किती खालच्या थराला गेले आहेत, किती वैफल्यग्रस्त आहेत हे स्पष्ट दिसतय. नागपूरच्या विधानसभेत गेल्या दोन दिवसांपासून सरकारवर आणि विशेषत: मुख्यमंत्र्यांवर भूखंड भ्रष्टाचाराचे आरोप सुरू आहेत. त्यांना तोंड देताना सरकारची धावपळ आणि पळापळ सुरू आहे. त्यातून लक्ष विचलित करण्यासाठी असे आरोप कुणी करत असेल तर ते भ्रमात आहेत.”

“भ्रष्ट मार्गानं हे सरकार सत्तेवर आलं असून ते भ्रष्टाचाराच्या ओझ्यानंच पडेल. आमच्यावर तुम्ही असे कितीही आरोप केले, माझ्यासारख्या माणसावर कितीही खोटे खटले दाखल केले, आमची माणसं फोडण्याचा प्रयत्न केला तरी शिवसेना आणि शिवसैनिक खचणार नाहीत. मागे हटणार नाहीत. सध्या जे हा खेळ करत आहेत, त्यांचं राज्य औटघटकेचं आहे. या सगळ्यांना पश्चात्ताप होईल”, असा इशाराही संजय राऊतांनी दिला.

पुढे ते म्हणाले, “राहुल शेवाळेंनी केलेल्या आरोपांना शुद्ध मराठी भाषेत हलकटपणा आणि नीचपणा म्हणतात. सुशांतसिंह राजपूत प्रकरण हे तेव्हाच्या विरोधी पक्षानं आम्ही सत्तेत असताना आशा प्रकारे उभं केलं आणि शेवटी ते त्यांच्यावरच उलटलंय. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयसह अनेक तपास यंत्रणांनी केला आहे. सीबीआयनं सुशांतसिंह राजपूत यांची आत्महत्याच होती हे सांगितलं आहे”, असंही राऊत म्हणाले.

राहुल शेवाळेंनी नेमके काय आरोप केलेत?

सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर सीबीआय, बिहार पोलीस आणि मुंबई पोलिसांनी तपास केला. मात्र, या तिघांच्या तपासाची माहिती जनतेपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे जनतेच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. जनतेला त्या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. रियाची ड्रग्जसंबंधात चौकशी करण्यात आली होती. रियाला सुशांतच्या मृत्यूपूर्वी जे कॉल आले होते त्यासंदर्भात बिहारच्या पोलिसांच्या तपासात उल्लेख आहे. रियाला ते एयू या नावानं 44 काॅल आले होते. या तपासाच्या टीमने एयूचा अर्थ अनन्या उद्धव असा सांगितला होता. परंतु, एयूचा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा आहे, अशी माहिती बिहार पोलिसांनी दिली. सीबीआयनं याबाबतची माहिती अद्याप लोकांसमोर आणलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाच्या तपासाची माहिती जनतेला मिळावी म्हणून मी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला, असं राहुल शेवाळेंनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये