राहुल गांधींकडून संसदेत फ्लाईंग किस? स्मृती इराणींनी केला गंभीर आरोप

नवी दिल्ली | मणिपूरवरून संसदेत आक्रमक भाषण करून तसेच मोदी सरकारवर टीकेची झोड उठवून आपलं भाषण संपवून निघालेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा अतिशय गंभीर आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रारीचं पत्र दिलं आहे. राहुल गांधींनी संसदेत केलेल्या गैरवर्तनासंदर्भात भाजपच्या 22 खासदारांनी तक्रारीचं पत्र दिल्याची माहिती आहे.
राहुल गांधींनी सभागृहात फ्लाईंग किस दिल्याचा स्मृती इराणींचा आरोप
संसदेच्या अधिवेशनाचा आजचा दिवस वादळी ठरला. खासदारकी बहाल झाल्यानंतर आज राहुल गांधी अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेत सहभागी झाले. मात्र आजच्याच दिवशी राहुल गांधी आरोपांच्या भोवऱ्यात अडकले. सभागृहातून जात असताना राहुल यांनी फ्लाईंग किस दिल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी केला आहे. लोकसभा सचिवालयाची दिलेल्या माहितीनुसार संसदेत असभ्य वर्तनाबाबत सर्वांशी बोलून नियमानुसार कारवाई केली जाईल, असं सांगितलं जात आहे.